कराळे मास्तरांना 24 हजारांवर मतं, हकालपट्टीवर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर पदवीधर निवडणुकीत मतदानाच्या काही तास आधी पक्षातून काढलेल्या नितेश कराळे यांना पहिल्या पसंतीची 24,249 मतं मिळाली. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भूमिका मांडली.
नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी गेले 30 तासांहून जास्त वेळ सुरू असून ती आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता मोजणीला सुरुवात झाली होती. पण मतपत्रिकांची वाटणी होऊन प्रत्यक्ष मोजणी सुरू व्हायला दुपारचे चार वाजले.
पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी आघाडीवर होते. बुधवारी पहाटेपर्यंत दुसरी फेरी संपली आणि तेव्हा भाजपचे सुधाकर कोहळे (Sudhakar Kohale) पुढे गेले. कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या मतांचा ठरलेला कोटा गाठता आला नाही. त्यामुळे सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होती. आतापर्यंत कोहळे यांना 61,215 आणि वंजारी यांना 57,052 मतं मिळाली असून कोहळे 4,163 मतांनी पुढे आहेत.
या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नितेश कराळे (Nitesh Karale) यांनी पहिल्या पसंतीची 24,249 मतं घेतली. अनेक जण त्यांच्या कामगिरीचं कौतुक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
अशा प्रकारे कुणाची पक्षातून हकालपट्टी होऊ नये आणि कार्यकर्त्यांनीही पक्षावर ही वेळ आणू नये, असं चव्हाण यांनी म्हटलं. कराळे मास्तरांबद्दल यापेक्षा जास्त बोलायला त्यांनी नकार दिला.
कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे यांची मतदानाच्या काही तास आधी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी स्वतः निवडणूक लढवून पक्षशिस्तीचा भंग केला, तसंच शरद पवार गटाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा संभ्रम निर्माण केला, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
या निर्णयाने कराळे यांना वाईट वाटलं. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकला आणि त्यात ते ढसाढसा रडले. मी पवार साहेबांचा सन्मान करतो, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो, पण माझ्यावरची कारवाई मला चुकीची वाटते, असं कराळे यांनी म्हटलं होतं. सहा जिल्ह्यांत मी एकटा पुरून उरलो म्हणून दबाव टाकून कारवाई करायची, असंही ते म्हणाले होते.
दरम्यान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुण्यातून हर्षदा जाधव आणि छत्रपती संभाजीनगरमधून प्रतापसिंह पाटील हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यावर माजी खासदार आणि शरद पवार गटाच्या नेत्या विद्याताई चव्हाण म्हणाल्या की, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी संपली असं ज्यांना वाटत होतं, त्यांच्या आता लक्षात आलं असेल की महाराष्ट्रात शरद पवारांचा दबदबा आजही कायम आहे. जिथे सुशिक्षित मतदान आहे, तिथे पवार साहेबांवरचा विश्वास कायम आहे, आणि निवडणूक आयोगाचा जो घोळ आहे त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसला, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.