बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

विधान परिषद निकाल: पाचपैकी महायुतीला तीन, महाविकास आघाडीला दोन जागांचे चित्र

विधान परिषद निकाल: पाचपैकी महायुतीला तीन, महाविकास आघाडीला दोन जागांचे चित्र छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
PT24 टीम

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतमोजणीत महायुतीला सर्व जागा जिंकता येणार नाहीत, असे चित्र आहे. मराठवाड्यात आणि पुणे पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे आहेत.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीचा एकतर्फी विजय होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. महायुतीच्या नेत्यांनी त्यासाठी फिल्डिंगही लावली होती, त्यामुळे राज्यात महायुतीचीच हवा राहील, असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीने महायुतीचा विजयरथ रोखल्याचे दिसत आहे.

पाच जागांसाठी ही निवडणूक झाली. आतापर्यंतच्या कलांनुसार महायुतीला तीन आणि महाविकास आघाडीला दोन जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजेच सगळ्याच्या सगळ्या जागा जिंकण्याचे महायुतीचे स्वप्न भंगताना दिसत आहे. हा महायुतीसाठी मोठा फटका असल्याचे सांगितले जात आहे. अंतर्गत गटबाजीचा फटका महायुतीला बसल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत, तर महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण पिछाडीवर आहेत. पाटील यांना 73931 मते मिळाली आहेत. चव्हाण यांना 60768 मते मिळाली, तर रविराज साबळे यांना 19835 मते मिळाली आहेत. पाटील 13163 मतांनी पुढे आहेत. शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा उघड प्रचार केला होता. त्याचा फटका चव्हाण यांना बसताना दिसत आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघात महायुतीचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. त्यांना 60,924 मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी यांना 56,630 आणि अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना 24,249 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोहळे पुढे असले तरी कराळे यांनी दुसऱ्या पसंतीची मते अभिजीत वंजारी यांना द्यायला सांगितले होते. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये गेम पालटणार की आहे तीच परिस्थिती राहणार, हे पाहावे लागेल.

अमरावती शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किरण सरनाईक जिंकण्याची शक्यता आहे. त्यांना 8575 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना 4925, तर अपक्ष उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते मिळाली आहेत. त्यामुळे सरनाईक यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे. भाजपचे कौस्तुभ गावडे यांना 17600 मते मिळाली आहेत. शिंदे गटाचे सचिन सानप यांना 11328, तर काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना 8350 मते मिळाली आहेत. पुणे राखण्यात भाजप यशस्वी होताना दिसत आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात मात्र शरद पवार गटाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांना 1 लाख 12 हजार 400 मते मिळाली आहेत. भाजपच्या स्मिता जाधव यांना 1 लाख 2 हजार मते मिळाली, तर उद्धव ठाकरे गटाचे सुनील मोदी यांना 3066 मते मिळाली आहेत. या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवार पुढे असल्याचे चित्र आहे.

#नागपूर#PT24#Nagpur

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ