नागपूर पदवीधर मतमोजणी दुसऱ्या दिवसापर्यंत लांबण्याची शक्यता, पहिल्याच दिवशी 34 टपाली मतपत्रिका अवैध
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी मानकापूर येथील क्रीडा संकुलात सुरू झाली. टपाली मतांच्या मोजणीतच 238 पैकी 34 मते अवैध ठरली आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी नागपूरमधील मानकापूर येथील क्रीडा संकुलात सुरू झाली आहे. मतमोजणीची सुरुवात टपाली मतपत्रिकांच्या मोजणीने झाली. एकूण 238 टपाली मतांपैकी 34 मते अवैध ठरवण्यात आली आहेत.
टपाली मतदानातच बाद मतांचे प्रमाण जास्त दिसल्याने प्रत्यक्ष मतदानातही मोठ्या संख्येने मते अवैध ठरतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांचा आवश्यक कोटा अजून निश्चित होऊ शकलेला नाही.
आकडेवारीनुसार या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या आधारावर जिंकण्यासाठी उमेदवाराला सुमारे 80 हजार मतांचा कोटा गाठावा लागणार आहे. मात्र लढत अतिशय अटीतटीची आहे आणि अवैध मतांचीही शक्यता आहे. हे लक्षात घेता, पहिल्याच पसंतीत कोणताही उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी मानली जात आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण झाला नाही, तर दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागेल. ही प्रक्रिया खूप वेळ घेणारी असल्याने निवडणुकीचा अंतिम निकाल बुधवारी सकाळपर्यंत लागण्याची जोरदार शक्यता आहे.
सरळ लढत आणि दावे
या जागेवर मुख्य लढत भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांच्यात सरळ आहे. मतमोजणीच्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा ठाम दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी दावा केला आहे की, पहिल्याच फेरीत त्यांना 40 ते 45 हजार मते मिळतील आणि ते पहिल्या फेरीतच निवडून येतील.
ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः दोन दिवस नागपुरात तळ ठोकून होते.
भाजपसाठी बदल्याची लढाई
ही जागा गेल्या वेळी अभिजीत वंजारी यांनी भाजपकडून हिसकावून घेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा पराभव भाजपला बोचत होता, म्हणूनच यंदा भाजपने अगदी काटेकोर नियोजन केले होते. कुठूनही भगदाड पडू नये, याची पूर्ण काळजी घेण्यात आली. बंडखोर अनिल सोले यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या घरी गेले होते. त्यांचे प्रयत्न यशस्वीही ठरले. मात्र या निकालानंतर भाजपमधील अंतर्गत धुसफूस आणि नाराजी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.