गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पदवीधर निवडणूक: औरंगाबाद विभागात डॉ. प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांच्या फरकाने जिंकले

पदवीधर निवडणूक: औरंगाबाद विभागात डॉ. प्रतापसिंह पाटील १८,१२४ मतांच्या फरकाने जिंकले छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव केला.

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ - विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी १८ हजार १२४ मतांचे मताधिक्य मिळवले. अंतिम मतमोजणीत डॉ. पाटील यांना ८५ हजार ८७६ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते पडली.

पसंतीक्रमानुसार ३९ उमेदवारांची वगळणी आणि मतहस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा निकाल निश्चित झाला. भारत निवडणूक आयोगाकडून निकालाच्या पुढील प्रक्रियेला मान्यता मिळाल्यावर गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी डॉ. पाटील यांना विजयी घोषित केले. त्यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्या वेळी निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चवरे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी हजर होते.

मतमोजणी छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे झाली. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि निवडणूक निरीक्षक श्रीमती माधवी खोडे-चवरे यांच्या देखरेखीखाली हे काम चालले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या आठ जिल्ह्यांतील ८४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले होते. एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते आणि मोजणीसाठी ७० टेबले लावण्यात आली होती.

सुरुवातीला मतपत्रिकांची पडताळणी आणि वर्गीकरण झाले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी तीन फेऱ्यांत पूर्ण झाली. पहिल्या फेरीत ७० हजार ५१९ मतपत्रिका मोजल्या गेल्या, तर दुसऱ्या फेरीअखेर एकूण १ लाख ४० हजार ५४३ मतपत्रिकांची मोजणी झाली. आकडेवारीनुसार १ लाख ७७ हजार ११५ मते वैध आणि १६ हजार ५४० मते अवैध ठरली. वैध मतांच्या आधारे विजयासाठी ८८ हजार ५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

पहिल्या पसंतीच्या मोजणीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना ७३ हजार ९३१, सतीश चव्हाण यांना ६० हजार ७६८, अपक्ष उमेदवार रविराज उर्फ अण्णासाहेब सावळे-पाटील यांना १९ हजार ८३५ आणि दिलीप घुगे यांना ८ हजार ४३९ मते मिळाली. कोणत्याही उमेदवाराने कोटा गाठला नाही. त्यामुळे निवडणूक नियमांनुसार कमी मते मिळालेल्या उमेदवारांना टप्प्याटप्प्याने वगळून, त्यांच्या मतपत्रिकांवरील पुढच्या उपलब्ध पसंतीक्रमानुसार मते इतरांकडे वळवण्यात आली.

दिलीप घुगे यांच्या मतपत्रिकांमधून २ हजार २८५ मते डॉ. पाटील यांच्याकडे, तर १ हजार ८८१ मते सतीश चव्हाण यांच्याकडे गेली. ३९व्या वगळणीत रविराज सावळे-पाटील यांच्या मतपत्रिकांमधून ६ हजार ४६९ मते डॉ. पाटील यांना, तर ३ हजार २४१ मते सतीश चव्हाण यांना मिळाली. ४१ पैकी ३९ उमेदवार वगळल्यानंतर डॉ. पाटील आणि चव्हाण हे दोघेच उरले. त्या टप्प्यावरही कोणीही कोटा पूर्ण केला नव्हता.

मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेली मतमोजणी गुरुवारी पहाटे अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सलग ४५ तासांहून अधिक काळ चालली. पडताळणी, वर्गीकरण, पहिल्या पसंतीची मोजणी, उमेदवारांची वगळणी, मतहस्तांतरण, अंतिम आकडेवारीची तपासणी आणि निकाल निश्चिती हे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षक यांच्या देखरेखीखाली झाले. मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाने काम केले.

मतमोजणी केंद्र आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त ठेवला होता. सुविधा, साहित्य, स्वच्छता आणि इतर व्यवस्थांसाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सेवक आणि कंत्राटी मनुष्यबळ यांचेही सहकार्य मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांनी निवडणूक निरीक्षक, मोजणीत सहभागी सर्व अधिकारी-कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि सहाय्यक यंत्रणांचे आभार मानले.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ