वर्धा जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळ ट्रिगर-२ च्या यादीत; पाणीटंचाईची चिंता वाढली
शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या दुष्काळ ट्रिगर-२ च्या यादीत वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश झाला आहे. पावसाची ३६.९२ टक्के तूट राहिल्याने चारा आणि पाणीटंचाईचा धोका वाढला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा समावेश दुष्काळ ट्रिगर-२ च्या यादीत झाला आहे. शासनाने बुधवारी ही यादी जाहीर केली. यंदाच्या मान्सून काळात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय सुपर अल-निनोच्या प्रभावामुळे पावसाचा मोठा खंड कायम राहिला आणि त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे.
यापूर्वी, गेल्या महिन्यात शासनाने दुष्काळी ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांची यादी जाहीर केली होती. त्या यादीत वर्धा जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश होता, पण कारंजा तालुक्याला वगळण्यात आले होते. आता बुधवारी जाहीर झालेल्या ट्रिगर-२ च्या यादीत वर्धा, देवळी, सेलू, समुद्रपूर, हिंगणघाट, आर्वी, आष्टी आणि कारंजा या आठही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील दुष्काळाचे ढग आणखी गडद झाले असून येत्या काळात जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न पेटणार हे जणू निश्चितच झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी ८७४.०५ मिमी पाऊस पडतो. यंदा मात्र या चार महिन्यांत जिल्ह्यात फक्त ५५८.०३ मिमी पाऊस झाला. म्हणजेच पावसाची तब्बल ३६.९२ टक्के तूट राहिली. ऑक्टोबर महिन्यातील १३ दिवस उलटूनही पावसाचा खंड कायम आहे.
कमी पाऊस आणि पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये नाममात्र उपयुक्त जलसाठा आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीखालील पाण्याची पातळीही झपाट्याने खाली जात आहे. पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत. इतकेच नव्हे तर येत्या काळात जिल्ह्याला चारा आणि पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
येत्या काळात अल-निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे आणि जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जाणार आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी येणाऱ्या जलसंकटावर मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचा आतापासूनच काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांचे नियोजन केले जात आहे. चारा आणि पाणीटंचाईचा प्रश्न ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना सतावणार आहे. त्याचप्रमाणे जंगलाने व्यापलेल्या परिसरातील नैसर्गिक पाणवठे कोरडे पडत असल्याने तृणभक्षी प्राण्यांचे खाद्य येत्या काळात जणू नाहीसेच होणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करताना वन्यप्राण्यांनाही जंगलात पाणी आणि खाद्य मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.