दुष्काळी स्थितीत बल्लारपूरच्या शेतांना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट, नुकसानीची पाहणी
आष्टी रिठ व पळसगाव येथे भात आणि कापूस पिकांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राची प्रत्यक्ष पडताळणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतपिकांच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी (दि. 9) बल्लारपूर तालुक्यातील आष्टी रिठ व पळसगाव या गावांना भेट दिली.
या दौऱ्यात त्यांनी शेतात जाऊन भात आणि कापूस पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. बाधित शेतकऱ्यांशी थेट बोलून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बल्लारपूर तालुक्यात पावसाने खंड दिल्यामुळे भात आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पंत यांनी आष्टी रिठ व पळसगाव येथील विजय बालाजी भोयर, रामदास भोयर, मुकुंदा मडावी आणि मारुती मडावी यांच्या शेतातील पिकांची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला.
पावसाअभावी पिकांवर झालेला परिणाम, उत्पादनात होऊ शकणारी घट, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि झालेले नुकसान याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्याकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अचूक आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन होणे आवश्यक आहे, असे सांगत त्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीची प्रक्रिया गतीने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, नुकसानीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या 20 टक्के क्षेत्राचे ग्राउंड ट्रुथिंग (प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी) तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.
ग्राउंड ट्रुथिंगच्या कामात विलंब नको, असे त्यांनी स्पष्ट केले. महसूल, कृषी आणि जिल्हा परिषद या तिन्ही यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि पिकांच्या नुकसानीचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे त्यांनी सांगितले. या अहवालाच्या आधारे शासनाकडे आवश्यक प्रस्ताव तातडीने पाठविणे शक्य होणार असल्याने ग्राउंड ट्रुथिंगच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही निर्देश जिल्हाधिकारी पंत यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, ग्राम महसूल अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विलास कुमरे, पळसगावच्या सरपंच संगिता सोयाम, वासुदेव मडावी यांच्यासह परिसरातील शेतकरीही यावेळी हजर होते.
पाहणीनंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ग्राम पंचायत कोर्टीमक्ता येथील केशर आंबा फळबाग लागवड क्षेत्राला भेट दिली. विकसीत भारत ग्रामीण रोजगार आणि आजिविका हमी योजना (व्हीबीजी-राम-जी) व जिल्हा खनिज निधी अभिसरण अंतर्गत या क्षेत्रावर केशर आंब्याची फळबाग लागवड करण्यात आली आहे.