उल्हासनगर स्टेशनबाहेर युट्यूबर हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या
उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात दोन गोळ्या झाडल्या; पोलीस जुन्या वैमनस्यासह सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
उल्हासनगरमध्ये बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर स्थानिक प्रसिद्ध युट्यूबर हरीश गजवानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाण्यातील मनपाडा परिसरात शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच उल्हासनगरमध्ये पुन्हा गोळीबाराचा थरार घडला आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येऊन गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे उल्हासनगरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरीश गजवानी हे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जात होते. त्याचवेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले आणि अगदी जवळून त्यांच्या डोक्यात दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच गजवानी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ परिसरात पळापळ झाली.
गजवानी यांच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या हत्येला चार वर्षांपूर्वीच्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जात आहे. चार वर्षांपूर्वी संशयित आरोपी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या प्रकरणात हरीश गजवानी हे आरोपी असल्याची माहिती आहे. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार किंवा आणखी कोणते कारण या हत्येमागे आहे का, याचीही पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे. सखोल तपासानंतरच हत्येमागचे नेमके कारण आणि हल्लेखोरांची भूमिका स्पष्ट होणार आहे.