नर्सरी ते पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे किमान वय ठरले; 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने नवे निकष
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 नुसार राज्य सरकारने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान वय निश्चित केले असून, शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्य सरकारने पूर्व-प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी मुलांचे किमान वय ठरवून दिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतुदींनुसार राज्य सरकारने हे वयाचे निकष निश्चित केले आहेत. याबाबतचा शासन निर्णय म्हणजेच जीआर शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. नवीन निकष शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.
ठरवलेले वय 30 जून रोजी पूर्ण असणे बंधनकारक असेल. या निर्णयानुसार बालवाटिका-1 म्हणजेच नर्सरीच्या प्रवेशासाठी तीन वर्षे पूर्ण असण्याचा निकष शैक्षणिक वर्ष 2027-28 पासून लागू होईल. बालवाटिका-2 म्हणजेच ज्युनिअर के.जी.साठी चार वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2028-29 पासून, तर बालवाटिका-3 म्हणजेच सिनिअर के.जी.साठी पाच वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2029-30 पासून लागू होईल. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याचा निकष 2030-31 पासून लागू होणार आहे.
याआधी राज्यात राज्य मंडळाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळांसह सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या दिनांकांनुसार वयोमर्यादा धरली जात होती. पूर्व-प्राथमिक वर्गांच्या प्रवेशासाठी तर वयाची निश्चित अटच अस्तित्वात नव्हती. केंद्र सरकारने इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलाचे वय सहा वर्षांपेक्षा अधिक असावे, असे कळवले आहे. या नव्या नियमांमुळे राज्यातील सर्वच शाळांमध्ये प्रवेशप्रक्रियेत सुसूत्रता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना हे नवीन वयाचे निकष लागू होणार नाहीत. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून मागचा वर्ग उत्तीर्ण झालेल्या नियमित विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देताना वयाचे निकष लावण्यापासून सूट देण्यात आली आहे.
पूर्व-प्राथमिक वर्गातील नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळाप्रमुख स्तरावर किमान आणि कमाल वयोमर्यादेत 15 दिवसांची सूट देता येईल. पायाभूत वर्गांतील नामांकन आणि नर्सरी ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील सूचनांचे पालन करावे लागेल. नवीन वयोमर्यादेनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सूचना आणि मार्गदर्शक सूचना शिक्षण संचालक (प्राथमिक), प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून दिल्या जाणार आहेत.