बुधवार, 7 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:01 IST

दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करू: उपमुख्यमंत्री शिंदे

परभणीतील शिवसेनेच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करू: उपमुख्यमंत्री शिंदे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

दुष्काळाच्या संकटात राज्यातील गोरगरीब शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील गांधी पार्क मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. बळीराजाला मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, असेही ते म्हणाले.

संकटाच्या काळात शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवू, कर्जपुनर्गठन करू आणि चाऱ्याची व्यवस्थाही करू, असे शिंदे यांनी सांगितले. संकटात शेतकऱ्यांसाठी शिवसेना १०० टक्के समाजकारण करेल, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या सेवा पर्वानिमित्त शिवसेना राज्यभरात "सेवा से समर्पण" ही गौरव यात्रा काढणार आहे. या उपक्रमाची सुरुवात आज परभणी जिल्ह्यातून झाली. शिंदे यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या मुलांना २५०० सायकली आणि लाडक्या बहिणींना २५०० शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

आज दुष्काळाचे सावट आहे, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण संकटात असल्याची आपल्याला जाणीव आहे, असे शिंदे म्हणाले. या सावटात बळीराजाला आणि त्याच्या कुटुंबाला शिवसेनेच्या माध्यमातून काही ना काही मदतीचा हात दिला पाहिजे, आधार दिला पाहिजे, असा संकल्प आम्ही केला आहे, असेही ते म्हणाले. या गौरव यात्रेत २५ हजार सायकली, २५ हजार शिलाई मशीन, शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा आणि गरजू वस्तूंचे वाटप केले जाईल, तसेच सामुदायिक विवाहांचे आयोजन होईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळाचे संकट असले तरी राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

पंतप्रधानांनी व्यस्त दिनक्रमातही एक तास चर्चा केली, असे शिंदे यांनी सांगितले. त्यातील अर्धा तास राज्यातील दुष्काळ आणि लाडक्या बहिणींवर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, असे ते म्हणाले.

दुष्काळाचे संकट मोठे आहे, असे सांगून शिंदे म्हणाले की राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहे आणि बळीराजाला कधी वाऱ्यावर सोडले नाही. आताही सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. राज्याचे सर्व मंत्रिमंडळ बांधावर गेले, शेतकऱ्यांची कैफियत ऐकली आणि त्यांना धीर देण्याचे काम केले, असे त्यांनी सांगितले.

शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे, असे शिंदे म्हणाले. राजकारण न करता सगळ्यांनी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी सर्व राजकीय पक्षांना केले. राजकारणासाठी इतर व्यासपीठे आहेत, पण या संकटकाळात शिवसेना ८० टक्के नव्हे तर १०० टक्के समाजकारण करेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी या कसोटीच्या काळात हार मानू नये आणि खचून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

शिंदे पुढे म्हणाले की, २०१४ नंतर देश आर्थिक महासत्तेकडे चालला आहे. भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले, असे त्यांनी सांगितले. नेशन फर्स्ट या हेतूने मोदीजी काम करत आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री ते प्रधानमंत्री अशी सार्वजनिक जीवनातील २५ वर्षे मोदीजी यांनी पूर्ण केली. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी मोदीजी डगमगले नाहीत, असे शिंदे म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केले, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ