शनिवार, 10 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:00 IST

वाशिममध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागातील शेतांची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा बैठकीत आढावा घेतला आणि नंतर नुकसानग्रस्त शेतांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.

वाशिममध्ये केंद्रीय पथकाकडून दुष्काळी भागातील शेतांची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकाने शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट दिली. आधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पथकाने प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. पथकातील सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे ११ सदस्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकात कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग यांसह संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकारी अर्जेशकुमार मधोक, महेश कुमार, सीमा रानी, संजय मीना आणि अभय भारत हे पथकात सहभागी आहेत.

बैठकीला वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे आणि अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना उपस्थित होते. वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान आणि कृषी सहसंचालक गणेश घोरपडे हेही हजर होते. अमरावती विभागातील जिल्हाधिकाऱ्यांकडून आपापल्या जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले.

पीक नुकसान, पाणी उपलब्धता आणि टँकरची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारक यांचे प्रश्न, तसेच मजुरांच्या स्थलांतराची शक्यता या बाबींकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पथकाचे लक्ष वेधले. बैठकीत घोरपडे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी संचालन केले.

दुपारी १ वाजता दौऱ्याच्या पुढील टप्प्यात पथकाने मानोरा तालुक्यातील कुपटा येथे मोहम्मद सादिक मोहम्मद शफी यांच्या शेताला भेट दिली. कारंजा तालुक्यातील काळीकारंजा येथे त्र्यंबक फकिरा गुल्हाने आणि पानविहीर येथे रमेश भाऊराव थेर यांच्या शेतांचीही पाहणी झाली. पीक नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासोबतच पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बैठकीनंतर पथकाने जिल्ह्यातील विविध गावांना भेटी देऊन दुष्काळी परिस्थिती, पिकांचे नुकसान आणि पाणीटंचाईची प्रत्यक्ष पाहणी केली. वाशीम तालुक्यातील सुपखेला येथे दयाराम विठ्ठल राऊत यांच्या शेताला भेट देऊन नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर मंगरूळपीर तालुक्यातील स्वासिन येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाहणी करून पथकाने परिसरातील पाणीटंचाईचा आढावा घेतला. शेतकऱ्यांशी संवाद साधून पथकाने त्यांची व्यथा जाणून घेतली.

दुष्काळग्रस्त भागातील पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि प्रत्यक्ष परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन पथकाकडून केले जाणार आहे. त्यानुसार दुष्काळाची वस्तुस्थिती, शेतीपिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती केंद्र सरकारसमोर मांडली जाणार आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ