सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
22:35 IST

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना होणार

राज्यातील दुष्काळामुळे शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. मदतीचे ट्रक मेळाव्यातून रवाना केले जाणार आहेत.

शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी, दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक रवाना होणार छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात दुष्काळ पडल्यामुळे शिवसेनेने यंदाचा दसरा मेळावा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना समर्पित केला आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी मात्र मुंबईत येण्याऐवजी शेतकऱ्यांच्या घरी जावे, असे आवाहन पक्षाने केले आहे. शेतकऱ्याच्या दारी मदतीचे तोरण लावावे, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने मुंबईत येतात, पण यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता त्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी पक्षाची भूमिका आहे.

गोरेगाव येथील नेस्कोमध्ये मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दुष्काळाच्या संकटामुळे यंदा सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी शिवसेना नेत्यांच्या भाषणांनी थेट मेळाव्याला सुरुवात होईल. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे, असे पक्षाने म्हटले आहे. शेतकरी कुटुंबांना या कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत या मेळाव्यात दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे ट्रक राज्यातील विविध भागांत रवाना केले जातील. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे शिवसैनिकांना राज्यव्यापी कार्यक्रम देतील.

दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळावे, यासाठी शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठीही शिवसेनेच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.

पक्षाने दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतनिधीचे धनादेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ