सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
15:52 IST

कोंढाली-काटोल मार्गावर भीषण अपघात, देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू

कोंढाली-काटोल मार्गावर कलकुही-मेंढेपठार वळणाजवळ क्रूझर आणि मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन दीपांशु चाफले, रोशन चाफले आणि लोकेश बारंगे यांचा जागीच मृत्यू झाला.

कोंढाली-काटोल मार्गावर भीषण अपघात, देवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या तीन तरुणांचा जागीच मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

नवरात्रोत्सवाच्या पवित्र काळात सगळा परिसर देवीच्या भक्तीत रंगलेला असताना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या एका दुःखद बातमीने दोन कुटुंबांचा आनंद कायमचा हिरावून घेतला. काटोल येथे जगदंबा मातेचे दर्शन घेऊन भक्तिभावाने परत येणाऱ्या तीन तरुणांचा कोंढाली-काटोल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि त्यांचा एक जवळचा मित्र आहे. दीपांशु दामोदर चाफले आणि रोशन दामोदर चाफले हे दोघे भाऊ कारंजा (घाडगे) येथील रहिवासी होते. त्यांचा मित्र लोकेश जगदीश बारंगे हा आष्टी तालुक्यातील माणिकवाडा येथील होता. या हृदयद्रावक घटनेमुळे कोंढाली आणि त्यांच्या मूळ गावी कारंजा (घाडगे) येथे शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ग्रामीण तालुक्यातील शिवा सावंगा येथील हेमराज गणपत उईके (27) हे आपल्या कुटुंबासह क्रूझर गाडीतून (क्रमांक एमएच 27 बीई 4389) श्रीक्षेत्र पारडसिंगा आणि काटोल येथे देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. दुसरीकडे, कोंढालीतील विकास नगर येथे राहून कामधंदा करणारे हे तीन तरुण मोटरसायकलवरून (क्रमांक एमएच 31 बीडब्ल्यू 3404) नवरात्रानिमित्त काटोलला देवीचे दर्शन घेऊन पुन्हा कोंढालीकडे येत होते.

शनिवारी रात्री साधारण 11.15 ते 11.30 च्या दरम्यान कोंढाली-काटोल मार्गावरील कलकुही-मेंढेपठार वळणाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की मोटरसायकलचा चक्काचूर झाला आणि त्यावरील तिघाही तरुणांनी जागीच प्राण सोडले.

हे तिघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील कारंजा आणि आष्टी तालुक्यांतील रहिवासी होते. उदरनिर्वाहासाठी ते सध्या कोंढाली येथे राहत होते.

अपघाताची माहिती मिळताच कोंढाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुमित परतेकी, हेड कॉन्स्टेबल प्रमोद तभाने आणि उमेश गुरनुले हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेचे चालक संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते परिमल हिंगणकर आणि सागर भारसाकले यांनीही तत्परतेने मदत व बचावकार्यात हातभार लावला.

पंचनामा झाल्यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी क्रूझरच्या चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताची नोंद करून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ