जरांगेंच्या क्लिपवरून महायुतीत ठिणगी; शिंदेंसाठी भाजपशी भिडलेले रामदास कदम शिवसेनेत एकटे पडल्याची चर्चा
मनोज जरांगे पाटील यांनी शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीत वाद पेटला आहे. भाजपला अंगावर घेणारे रामदास कदम पक्षात एकटे पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आणि त्यावरून महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. या क्लिपनंतर ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आणि इतर विरोधक एक खळबळजनक दावा करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि ते मनोज जरांगे यांना दिले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.
जरांगे यांनी समोर आणलेल्या या क्लिपवरून शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट मनोज जरांगे पाटील आणि मित्रपक्ष भाजप या दोघांनाही लक्ष्य केले. भाजपमधून एकनाथ शिंदे यांना संपवण्याचा विडा कोणी उचलला, असा थेट सवाल त्यांनी भाजपला विचारला. एवढेच नाही, तर रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. मित्रपक्षाकडून कथितपणे रचल्या जात असलेल्या कटाबद्दल त्यांनी या पत्रात नाराजी व्यक्त केली.
कदम यांनी हा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर भाजपचे प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नवनाथ बन आणि इतर नेते जोरदार पलटवार करत आहेत. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर रामदास कदम यांच्यावर टीका करत आहेत. जरांगे पाटील यांच्या क्लिपवरील टीकेनंतर कदम भाजपच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे आणि चारही बाजूंनी त्यांना टार्गेट केले जात असल्याचे चित्र दिसते.
दुसरीकडे शिंदे गटातून भाजपला थेट भिडताना फक्त रामदास कदमच दिसत आहेत. मंत्री उदय सामंत यांचा अपवाद वगळता शिवसेनेतील अन्य कोणत्याही नेत्याने भाजपला प्रत्युत्तर दिलेले नाही. कदम यांच्यावर भाजप आमदारांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे नेते गप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या क्लिपची चौकशी करावी, अशी मागणी केली. तरीही भाजपला थेट आव्हान देणारे आणि अंगावर घेणारे रामदास कदम पक्षातच एकटे पडले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस वाढल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
आता एकटे पडल्याची चर्चा असलेल्या रामदास कदम यांच्यासाठी शिंदे गट कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.