सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 07:47 IST

५०० कोटींच्या आरोपावर शिंदे यांचं जरांगेंना उत्तर: पुरावे द्या, चौकशी होईल

मनोज जरांगे पाटील यांनी केलेले ५०० कोटींचे आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळले आहेत. पुरावे असतील तर द्यावेत, असं ते म्हणाले.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधल्या दसरा मेळाव्यातून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपात आहे, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं. यावर शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून उत्तर द्यावं, असं आव्हानही त्यांनी दिलं होतं.

दसरा मेळाव्यात शिंदे यांनी याबद्दल काहीही वक्तव्य केलं नाही. मात्र आता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी कुणालाही ५०० कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत, असं शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं. जरांगे पाटील यांनी शहानिशा करून बोलावं, असंही ते म्हणाले.

शिंदे नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यासाठी आज दिल्लीत होते. तिथेच पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. आमचे सर्व प्रवक्ते यावर बोलत आहेत, असं सांगून त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल, असं म्हटलं. जरांगे पाटील यांच्या आरोपांवर शिंदे यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे.

दसरा मेळाव्यात शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांनी जरांगे पाटील यांना लक्ष्य केलं होतं. त्यात रामदास कदम आघाडीवर होते. त्यांनी मनोज जरांगे यांची औकात काढत पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलू नये, असा सज्जड दम भरला होता.

त्यानंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आता आपण पुरावे देणार असल्याचं सांगितलं. मी तुमच्याकडे एका साध्या प्रश्नाचं उत्तर मागितलं होतं, पण तुम्ही चिडताय, बावचळून गेला आहात, असं ते म्हणाले. तुम्ही मला ५०० कोटी रुपये दिले का, यावर हो किंवा नाही म्हणा, असं सांगत शिंदे साहेब काय बोलतात याची आपण वाट बघतोय, असंही त्यांनी म्हटलं. थोड्या दिवसांत कळेलच की आपण बोलण्याआधी विचार करायला हवा होता, असंही जरांगे पाटील म्हणाले.

शिंदे यांनी मराठा समाजाबद्दलही भूमिका मांडली. जरांगे पाटील मराठा समाजाचं काम करत होते, तेव्हा आपण मराठा समाजाला विविध कामांतून न्याय देण्याचं काम केलं, असं त्यांनी सांगितलं. गेल्या ६० वर्षांत जे काम झालं नाही, ते आम्ही केलं आणि आजही मराठा समाजाचं आरक्षण टिकलेलं आहे, असं शिंदे म्हणाले.

मनोज जरांगे मराठा समाजाचंच काम करत होते, म्हणून आम्ही त्यांना मदत दिली, असं सांगून शिंदे यांनी त्यांनी राजकीय प्लॅटफॉर्म बनवू नये, असंही म्हटलं.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ