सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 07:47 IST

जरांगेंच्या क्लिपवरून सपकाळांची शिंदे पिता-पुत्रांच्या अटकेची मागणी, वाघमारेंचा पलटवार

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अटकेची मागणी केली; खासदार ज्योती वाघमारे यांनी ती बालिश ठरवली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दाखवलेल्या ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजपवर टीका केली. भाजप किती कारस्थानी आहे, हे या क्लिपमधून समोर आलं आहे, असं ते म्हणाले. लोकांना कसं खरेदी केलं जातं ते पाहा, असंही त्यांनी सांगितलं. ज्यांची नावं या क्लिपमध्ये आहेत, त्यात शिंदे आणि त्यांच्या पुत्राचं नाव आहे, त्यांना अटक करून तातडीने ईडी चौकशी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

या मागणीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी लगेच प्रतिक्रिया दिली. ऑडिओ क्लिपच्या आधारावर अटक? हा कसला बालिशपणा, अशी टीका त्यांनी सपकाळ यांच्यावर केली. सपकाळ यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे का, असा सवाल करत त्यांनी हे आरोप निरर्थक आणि बिनबुडाचे असल्याचं म्हटलं. अशी मागणी ऐकून सपकाळ यांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, असंही त्या म्हणाल्या.

वाघमारे यांनी क्लिपबद्दलही बोट ठेवलं. जरांगे यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कुणीतरी तिसरीच अज्ञात व्यक्ती श्रीकांत शिंदे यांनी 500 कोटी रुपये दिल्याची अफवा पसरवत आहे, असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही पुराव्याशिवाय, फक्त एका कथित क्लिपच्या आधारावर थेट अटकेची मागणी करणं, सपकाळ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा त्यांचा सवाल होता.

उद्या कुणी दुसरी क्लिप रेकॉर्ड करून असा दावा केला की, हर्षवर्धन सकपाळ यांना आम्ही 500 कोटी नाही, कारण तेवढी तुमची औकात नाही, पण 5-50 हजार रुपये दिले आहेत, तर आम्हीही त्यांच्या अटकेची मागणी करायची का, असा प्रश्न वाघमारे यांनी विचारला. काँग्रेसने या बालिश तर्काला उत्तर द्यावं, असं त्या म्हणाल्या. पद टिकवण्यासाठी बिनबुडाचे आरोप सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. प्रदेशाध्यक्षपदाची कोणतीही पात्रता नसलेली ही व्यक्ती फक्त प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आरोपांची राळ उडवत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे साहेब हे लोकनेते आहेत, असं सांगून वाघमारे म्हणाल्या की श्रीकांत शिंदे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, खोटं-खरं ओळखणारे लोकनेते आहेत. असल्या तथ्यहीन आणि बाष्कळ आरोपांमुळे शिंदे साहेबांसारख्या लोकप्रिय नेत्याची प्रतिमा कधीही डागाळू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं.

त्याच वेळी सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकारला धारेवर धरलं. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची केली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि हेक्टरी 1 लाख रुपयांचं अनुदान द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. खरीप हंगामात मोठं स्थलांतर होऊ शकतं, त्यामुळे जुनी रोजगार हमी योजना त्वरित चालू करा, असंही ते म्हणाले.

लॉरेन्स बिश्नोई सरकारचा जावई आहे का, असा सवाल करत सपकाळ यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या गँगसाठी दरवाजे उघडले आहेत, असं ते म्हणाले. टोळी युद्ध बंद झालं होतं, पण सरकारच्या नाकावर टिच्चून हल्ले होत आहेत, असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राचा कारभार पांडू हवालदारच नाही, तर घाशीराम कोतवाल चालवतोय, असं ते म्हणाले. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर बिश्नोईला गुजरातमधून ऑर्थर रोडच्या अंडा सेलमध्ये आणावं, असंही त्यांनी म्हटलं.

संसदेत एपस्टीनचा उल्लेख केल्याची चर्चा दडपली गेली आहे, असं सपकाळ म्हणाले. जगभरात ज्यांची नावं या फाईलमध्ये येत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली; मात्र नैतिकदृष्ट्या घाणेरड्या प्रकरणात नाव आल्यानंतरही मोदींना हरदीप पुरींना वाचवलं जात आहे, असं त्यांनी म्हटलं. निवडणूक आयोगाबाबत कोणतीच चर्चा ओम बिर्ला करू देत नाहीत, असंही ते म्हणाले. महाभियोगाचा प्रस्ताव यापूर्वी सादर केला होता, तो स्वीकारला गेला म्हणून उपराष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला, तशी स्थिती ओम बिर्ला यांच्यावर येऊ नये, असंही सपकाळ म्हणाले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ