जरांगेंच्या क्लिपची चौकशी व्हावी, शिंदे गटाचे नेते आज फडणवीसांना भेटणार
मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या दाव्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. शिंदे गटाने आरोप फेटाळले असून चौकशीची मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज एक ऑडिओ क्लिप समोर आणली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या क्लिपमध्ये अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. 500 कोटींच्या आरोपांपासून ते राज्यातलं वातावरण दूषित करण्यासाठी रचलेल्या षडयंत्रांपर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे.
या क्लिपनंतर शिंदे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचं एक शिष्टमंडळ आज संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. या भेटीत क्लिपची चौकशी करावी, अशी मागणी केली जाणार आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या भेटीकडे लागलं आहे.
या कथित क्लिपमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले. हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत देण्यात आले, असंही त्यात म्हटलं आहे. याच दाव्यामुळे वातावरण तापलं आहे.
शिंदे गटाने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी शिंदे गटाची मागणी आहे. म्हणूनच त्यांचे नेते आज मुख्यमंत्र्यांना भेटून क्लिपची चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे यांनी फॉरेन्सिक लॅबकडे तक्रार करायला हवी, असं ते म्हणाले. त्यांनी तशी मागणी केली, तर राज्य सरकार त्या प्रकरणाचा तपास करेल, असंही म्हस्के यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे कधीच कुणाला कुणाच्या विरोधात लढायला सांगत नाहीत, तो त्यांचा स्वभावच नाही, असं त्यांनी म्हटलं. जरांगे यांचा आम्ही कायम आदर करतो, पण या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले. आम्ही एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे त्यांच्यावर कोणी बोललं तर आरे ला का रे आम्ही करणारच, असा इशारा नरेश म्हस्के यांनी दिला.
भाजपचे नेते नितेश राणे यांनीही या विषयावर ट्विट करून भूमिका मांडली आहे. कोणीतरी काहीतरी बोलणार, एकाकडून घेऊन दुसऱ्याला 500 करोड दिले म्हणजे पुरावा झाला का, असा सवाल त्यांनी केला. आमच्या कोकणाच्या कुठल्या ना कुठल्या टीट्यावर अमुकाने पैसे घेतले आणि अमुकाने पैसे दिले, अशी रोज चर्चा होते. त्याचा बोलणाऱ्याला फरक पडत नाही आणि ऐकणाऱ्यालाही पडत नाही, कारण ते कोणाकडून तरी ऐकलेलं असतं, असं राणे यांनी म्हटलं आहे.
जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, त्यांनी स्वतःमध्ये थोडीतरी माणुसकी आणि लाज जिवंत ठेवायला पाहिजे होती. आता संध्याकाळच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे राज्याचं लक्ष आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.