जरांगेंच्या 500 कोटींच्या आरोपावर संजय राऊत म्हणतात, शिंदेंना ईडीने समन्स पाठवावे
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी काल गंभीर आरोप केला होता. शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांकडून माझ्या नावावर 500 कोटी रुपये घेतले, अशी भाजप नेत्यांमध्ये चर्चा आहे आणि त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे जरांगे यांनी सांगितले होते. माझ्या नावावर पैसे घेतले की नाही, ते शिंदे यांनी जाहीर करावे आणि दोन दिवसांत यावर बोलावे, असे आव्हानही त्यांनी दिले होते. या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ उडाली.
आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयने दखल घेतली पाहिजे, शिंदे यांना तातडीने समन्स पाठवून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी मीडियाशी बोलताना केली.
जरांगे यांनी शिंदे यांना दसरा मेळाव्याच्या सभेत उत्तर देण्यास सांगितले होते. शिंदे यांनी मला गप्प करण्यासाठी भाजपकडून 500 कोटी घेतले, असे जरांगे म्हणतात. त्यावर राऊत म्हणाले, की जो माणूस भाजपकडून 500 कोटी रुपये घेतो, त्याची लायकी काय? तो कुणावर बोलतो? ठाकऱ्यांवर? रिजिम चेंजवर?
राऊत यांनी असा सवाल केला, की हे 500 कोटी कुठे गेले आणि पैसे देणारा तो भाजपचा नेता कोण? मराठा समाजाचा आवाज बंद करण्यासाठी 500 कोटी देण्याचा प्रकार झाला असेल, तर तो घृणास्पद आहे, असे ते म्हणाले. याचा अर्थ मनी लॉन्ड्रिंग झाले आहे, असेही त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांच्या एका आरोपाने अनिल देशमुख यांना अटक झाली होती, याची आठवण राऊत यांनी करून दिली. राज्याचे गृहमंत्री असलेल्या देशमुख यांच्यावर परमवीर सिंग यांनी 100 कोटींचा हवेतला आरोप केला होता. त्यानंतर लगेच ईडी आली, सीबीआय आली आणि देशमुख यांना समन्स गेले. इथे तर मनोज जरांगे पाटील हे जबाबदार व्यक्ती आहेत, त्यांनी आरोप केला आहे. मग आता ईडीने चौकशी केली पाहिजे आणि शिंदे यांना समन्स पाठवले पाहिजे. या 500 कोटींच्या आरोपावरून फडणवीस का शांत बसले आहेत, असा सवालही त्यांनी केला.
जरांगे यांच्याबद्दल राऊत म्हणाले, की मी त्यांना ओळखतो. मनोजदादा कधी खोटे बोलत नाहीत. एखाद्या शिवसैनिकासारखे ते नेहमी खरे बोलतात आणि जे मनात असते ते थेट बोलतात. फडणवीस खरोखर राज्याचे गृहमंत्री असतील आणि तशी जाणीव त्यांना असेल, तर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडे दिले पाहिजे. कुणाकडून पैसे घेतले आणि त्याचे काय झाले, याची चौकशी व्हावी. जरांगे यांच्याकडे जशी माहिती आहे, तशीच माझ्याकडेही आहे, असे राऊत यांनी म्हटले.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल कुणीही आडवा आला तरी त्याचा नायनाट करून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार, अशी गर्जना केली होती. यावरून राऊत यांनी भाजपला डिवचले. ही धमकी फडणवीस यांना दिली आहे, असे सांगून ते म्हणाले, की बिश्नोईची गँग कोणत्या लेव्हलला मंत्रिमंडळात काम करत आहे, हे दिसून येते. ही गँग फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये असेल, तर त्यांची सेक्युरिटी वाढवली पाहिजे आणि त्यांना केंद्रीय सुरक्षा दिली पाहिजे. मला फडणवीस यांची चिंता वाटते. ते हतबल का झाले आहेत, ते मुख्य बिश्नोईला घाबरले का, असे प्रश्न विचारून हे सर्व एप्रिलमध्ये जातील आणि यांचा पॉलिटिकल एन्काऊंटर होईल, असा दावा त्यांनी केला.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.