पाचशे कोटींच्या आरोपावर प्रसाद लाड यांचा संजय राऊतांवर हल्ला, चौकशी आणि अटकेची मागणी
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिर्डीत साईदर्शनानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावरील 500 कोटींच्या आरोपांवर भूमिका मांडली आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रतिक्रियेवरही मत व्यक्त केले.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अहिल्यानगर : भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad lad) यांनी आज शिर्डीत जाऊन साई समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर झालेल्या 500 कोटींच्या आरोपांसह वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली.
लाड म्हणाले की, 500 कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप म्हणजे पूर्णपणे फेक नेरीटिव्ह आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे स्क्रिप्ट मास्टर आहेत आणि ते रोज सकाळी कुठली ना कुठली क्लिप लिहितात, असे ते म्हणाले. सामनाच्या प्रेसमध्ये ही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, याची चौकशी व्हावी आणि एसआयटीने संजय राऊत यांना बोलावून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. राऊत यांची चौकशी करून त्यांना अटक करा, असेही लाड यांनी म्हटले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरही त्यांनी आपली भूमिका मांडली.
आम्ही कायम मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांची कुठेही बदनामी होणार नाही याची आम्हाला काळजी आहे, असे लाड यांनी सांगितले. ज्यांनी कोणी खोटंनाटं केले, त्यांना सगळे मिळून खोटे पाडू, असे म्हणत आपण जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीकांत शिंदे यांनी याआधी या विषयावर प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना लाड म्हणाले, हो, पाचशे कोटी ही फार मोठी रक्कम असते, ती हातातून, बॅगेतून किंवा गाडीतून नेता येत नाही. श्रीकांत शिंदे यांना जो प्रश्न पडला आहे, तोच मलाही पडला आहे. उद्धवजींच्या काळात जसे 100 कोटी जमा केले, तसे आता पाचशे कोटी जमा करायचे होते की काय, असा सवाल त्यांनी केला.
या प्रकरणाची चौकशी करून दूध का दूध पाणी का पाणी झाले पाहिजे, असे लाड म्हणाले. ही टेप कोणी, कोणापर्यंत आणि कशी पोहोचवली, याचाही शोध घेतला जाईल. मनोज जरांगे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला वेगळ्या दिशेला नेण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे आमचे नेते आहेत. त्यांचे पंख कापता येतील इतके ते छोटे नाहीत, कारण त्यांच्या पाठीशी देवेंद्रजी, अमित शहा आणि मोदीजी यांचे पूर्ण बळ आहे, असे लाड यांनी सांगितले. आम्ही सगळे त्यांच्या मागे ताकदीने उभे आहोत, असेही ते म्हणाले.
रामदास कदम यांच्याबाबत विचारले असता लाड म्हणाले की, माझे त्यांच्यावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. रामदास कदम यांना जे उत्तर द्यायचे होते, ते मी दिले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही त्यांना सूचना दिल्या आहेत. महायुती एकत्र राहिली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. रामदास कदम यांच्याकडून जे झाले, ते गंगेला मिळाले; साईबाबांच्या चरणी फुले वाहून त्यावर पाणी टाकले, असे म्हणत त्यांनी कदम यांच्याबद्दल अधिक बोलणे टाळले.
मुंढवा जमीन प्रकरणाबाबतही लाड यांनी भाष्य केले. देवेंद्रजींचे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, त्यामुळे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील दोषींना पकडले जाईल, असे ते म्हणाले. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असतानाही त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला चौकशीला बोलावले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री पारदर्शकतेने गृह खाते सांभाळतात, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.