सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 114 | Moderate 09:18 IST

जरांगेंच्या क्लिपमधले सगळे भाजपचे, आमचा संबंध नाही: रामदास कदम

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ३२ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज ३२ मिनिटांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आणि मोठी खळबळ उडाली. या क्लिपमध्ये तीन-चार जणांचं संभाषण आहे. त्यातली एक महिला मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचं सांगत आहे. क्लिप व्हायरल होताच शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली.

शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. क्लिपमधले सगळे लोक भाजपचे आहेत, मग आमचा संबंध काय, असं म्हणत त्यांनी हात झटकले. शिंदे गटाने या प्रकरणाचं सगळं खापर भाजपवर फोडलं आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कदम म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांचं योगदान मोठं आहे. जरांगे यांना एक गोष्ट लक्षात आणून देतो, असं सांगत ते म्हणाले की, त्यांनी हवं तर विनोद पाटील यांना विचारावं. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कायदेशीर अभ्यास कुणाच्या बंगल्यावर झाला, हे विनोद पाटील सांगतील, असं कदम यांनी म्हटलं.

कदम यांनी क्लिपच्या वेळेवरही बोट ठेवलं. आम्ही पडद्याच्या आड आहोत. ही क्लिप दोन, अडीच वर्षांपूर्वीची आहे. मग आता ती कशी बाहेर आली? विधानसभा झाली, लोकसभा झाली, तेव्हा ही क्लिप का आली नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यात तीन-चार लोक बोलत आहेत आणि ते भाजपचेच आहेत, याबद्दल दुमत नाही, असं ते म्हणाले. मी स्पष्ट सांगतो, मी ती क्लिप ऐकली आहे. हे लोक कॉन्फरन्स कॉलवर बोलत आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे कनेक्शन आहे, मुंबईचंही आहे, असं कदम यांनी सांगितलं.

उद्या कोणीही कॉन्फरन्स कॉलवर म्हणू शकतो, याला हजार कोटी दिले, त्याला दोन हजार कोटी दिले. त्याला शेंडा आणि बुंधा नाहीये ना, असं सांगत त्यांनी विचारलं की, मग दोन-अडीच वर्षं आपण का थांबला होता? आपल्या समाजाच्या नेत्यावर काही मंडळी अशा पद्धतीने आरोप करून बदनाम करत असतील, तर जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभं राहायला हवं होतं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

क्लिप तीन वर्षं जुनी असली तरी तिची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली. ती महिला कोण आहे, पैसे कुठे दिले आणि त्या महिलेकडे ५०० कोटी कुठून आले, हे समोर आलं पाहिजे, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्यासाठी क्लिप केली जात असेल, तर समाजाने एकत्र येऊन ते षडयंत्र हाणून पाडलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं.

याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचं कदम यांनी सांगितलं. आजच शिंदे यांना भेटून यावर चर्चा करणार असून अमित शाह यांनाही निवेदन देणार आहे, असं ते म्हणाले. क्लिपची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

चौकशी झाल्यावर सगळ्या गोष्टी पुढे येतील, असं कदम म्हणाले. दोन-तीन लोक बोलत आहेत आणि त्यात भाजपचा कोणताही मोठा नेता नाही, असं त्यांनी सांगितलं. ही क्लिप केवळ शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच केली होती का, हेही चौकशीत समोर येईल, असं ते म्हणाले.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ