ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारे यांचा शिंदे आणि फडणवीस यांना 'कर्मा रिटर्न्स'चा टोला
मनोज जरांगे यांच्या क्लिपमुळे राज्यात खळबळ उडालेली असताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर लांबलचक पोस्ट लिहिली आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मनोज जरांगे यांनी एका ऑडिओ क्लिपचा उल्लेख केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या कथित क्लिपमध्ये एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांना देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. ही क्लिप फक्त जरांगे यांच्याकडेच नाही, तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्याकडेही असल्याचं समोर आलं आहे. त्यावरून भाजप आणि शिंदे गट यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
या सगळ्यात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. "कर्मा रिटर्न्स" असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
अंधारे यांनी लिहिलं आहे की, दोन दिवसांपूर्वी त्यांनी या क्लिपचा फक्त दीड मिनिटांचा भाग ऐकला होता. आज त्यांनी 30-32 मिनिटांची पूर्ण ऑडिओ ऐकली आणि ऐकून त्या बधिर झाल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्लिपमध्ये सुशील कुलकर्णी आणि अतुल भातखळकर हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल खोटं नरेटिव्ह कसं तयार करायचं, यावर चर्चा करतात. उदयनराजेंनाही आपण manipulate करू शकू असं कुलकर्णीला वाटतं, याकडे बोट दाखवत त्यांनी विचारलं आहे की, हा कुलकर्णीचा माज आहे की उदयनराजेंचा अपमान? उदयनराजे आणि त्यांचे समर्थक यावर काहीच बोलत नाहीत, ही कसली अपरिहार्यता, असाही त्यांचा सवाल आहे.
वाढवण बंदर किंवा प्रकल्पांच्या नावाखाली लोकांना विस्थापित करण्याबद्दल जो भूमिका घेईल, तो देशविरोधी आहे आणि त्याला अमेरिका किंवा चायनाकडून फंडिंग मिळतं, असं नरेटिव्ह रुजवता येईल, अशी चर्चा क्लिपमध्ये असल्याचं अंधारे सांगतात. त्यासाठी वर्तमानपत्रांना मॅन्युपलेट करता येईल, असं कुलकर्णी आत्मविश्वासाने सांगतो. वर्तमानपत्रांनी त्याच्याविरुद्ध रान उठवायला हवं होतं, कारण हा त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असं त्या म्हणतात.
क्लिपमध्ये आपल्या नावाचाही उल्लेख असल्याचं अंधारे यांनी लिहिलं आहे. एखादी स्त्री कुठल्याही हल्ल्याने हार मानत नाही, तेव्हा तिच्या चारित्र्यावर हल्ला केला जातो, असा त्यांचा आरोप आहे. अंधारेंचं मॅन्युप्युलेशन करता येणार नाही, हे यातून स्पष्ट झालं, असंही त्या म्हणतात.
श्वेता शालिनी यांनी बैठकीत जरांगे यांना शिंदे यांनी 500 कोटी रुपये दिले आणि ते भाजपकडून घेऊन दिले, असं म्हटल्याचा उल्लेख अंधारे करतात. शिंदे यांच्या गोटातले अनेक जण 500 कोटी शिंदे यांनी आणले की नाही यावर चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस क्लिप तपासू असं म्हणतात, पण आम्ही पैसे दिलेच नाहीत असं स्पष्टपणे म्हणत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.
जरांगे यांचं आंदोलन शरद पवार चालवतात किंवा त्याला ठाकरेंचं पाठबळ आहे, असं लोकांना सारखं सांगायचं आणि वेगवेगळ्या युट्युब चॅनेलवरून तेच पेरत राहायचं, अशी रणनीती आखली जाते, असा अंधारे यांचा दावा आहे. सुशील कुलकर्णी, अतुल भातखळकर, श्वेता शालिनी आणि अतुल लिमये यांचा त्यांनी नावानिशी उल्लेख केला आहे. मराठे शक्तिशाली असले तरी स्वतःचा मेंदू वापरू शकत नाहीत, असं यांना सुचवायचं आहे, असं त्या लिहितात. मराठा समाजातूनच काही बायका तयार केल्या जातात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पोस्टच्या शेवटी अंधारे म्हणतात की, ऑडिओ क्लिप खरी आहे हे प्रत्येकाला कळतं, पण सत्ताधाऱ्यांना ती खोटी ठरवायला क्षणाचाही वेळ लागणार नाही. हे सगळं विसरायचं की लक्षात ठेवायचं, हे लोकांनी ठरवावं, असं सांगून त्यांनी शेवटी लिहिलं आहे: शिंदे, फडणवीस, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, karma returns.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.