पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर, सचिन सानप 6,200 मतांनी मागे
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत भाजपचे कौस्तुभ गावडे पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या विजयाची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव आघाडीवर आहेत.
पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या विजयाची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. मतमोजणीत गावडे पहिल्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गावडे आणि सानप यांच्या मतांमध्ये 6,200 मतांचा फरक आहे. म्हणजेच सानप पिछाडीवर आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर असलेले दत्तात्रय सावंत बाद झाले आहेत. काँग्रेसचे जयंत आसगांवकर मतमोजणीच्या चौथ्या फेरीत बाद झाले होते आणि त्यांच्या मतांची मोजणी सुरू आहे. त्या मोजणीतून दुसऱ्या क्रमांकावरचे सचिन सानप आणि तिसऱ्या क्रमांकावरचे दत्तात्रय सावंत यांच्या मतांत काही फरक पडतो का, हे पाहिले जात आहे. त्यानंतर पुढे कोण बाद होईल हे ठरेल आणि मग अंतिम निकाल समोर येईल. सानप यांच्या मतांची मोजणीही सुरू आहे.
दुसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघात अजून कोणत्याही उमेदवाराचा विजयासाठीचा कोटा पूर्ण झालेला नाही. प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी संपल्यानंतरही कोटा गाठता न आल्याने पुढच्या पसंतीच्या मतांची मोजणी करावी लागत आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा 1 लाख 13 हजार 95 मतांचा आहे. आतापर्यंत 21 उमेदवार बाद झाले आहेत.
21 व्या बाद फेरीनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष) यांना 1 लाख 11 हजार 279 मते मिळाली आहेत. भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना 1 लाख 2 हजार 427 मते आहेत. म्हणजेच हर्षदा देशमुख-जाधव यांनी स्मिता जाधव यांच्यावर 8 हजार 852 मतांची आघाडी घेतली आहे. कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी 1 हजार 816 मतांची गरज आहे. पहिल्या फेरीत मोठी आघाडी घेतलेल्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी सुरुवातीपासूनची ही आघाडी कायम ठेवली आहे, तर भाजपच्या स्मिता जाधव दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
इतर उमेदवारांपैकी सुनिल जबरचंद मोदी (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांना 3 हजार 66 मते मिळाली असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सोमनाथ जनार्धन साळुंखे यांना 2 हजार 638, नामदेवराव जाधव यांना 1 हजार 955, तर लक्ष्मण साहेबराव हरणावळ यांना 1 हजार 472 मते मिळाली आहेत.
दोन्ही मतदारसंघांतील मतमोजणी आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचत आहे. दुपारपर्यंत अंतिम निकाल समोर येईल, अशी शक्यता आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.