बुधवार, 28 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 103 | Moderate 01:04 IST

आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू

अमली पदार्थ विरोधी पथकातील 38 वर्षांचे हवालदार जावेद बागसिराज संत तुकारामनगर परिसरात संशयिताच्या मागे धावत असताना कोसळले आणि वायसीएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

आरोपीचा पाठलाग करताना पिंपरी-चिंचवडचे हवालदार जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराने मृत्यू छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पिंपरी शहराला ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी कर्तव्य बजावत असताना पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील अमली पदार्थ विरोधी पथकाचे 38 वर्षांचे हवालदार जावेद बागसिराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी (25 ऑक्टोबर) रात्री उशिरा संत तुकारामनगर परिसरात ही घटना घडली. एका संशयित आरोपीच्या मागे धावत असतानाच त्यांना अचानक त्रास सुरू झाला आणि ते जमिनीवर कोसळले.

संत तुकारामनगर परिसरात दोन संशयित आरोपी एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती जावेद बागसिराज यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती लगेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (अँटी नार्कोटिक्स सेल) आंत्रिक सोसायटीजवळ सापळा रचला. एमडी ड्रग्सची विक्री करण्यासाठी येणाऱ्या संशयितांना पकडणे हा या सापळ्याचा उद्देश होता.

पोलिसांची चाहूल लागताच विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला पथकाने जागेवरच पकडले. त्याचा दुसरा साथीदार मात्र अंधाराचा फायदा घेऊन पोलिसांना चकवा देत पळू लागला. जावेद यांनी न घाबरता, धाडसाने त्याचा पाठलाग सुरू केला. धावत असतानाच त्यांच्या छातीत असह्य कळा आल्या आणि ते खाली पडले.

सहकाऱ्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता त्यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी नेले. उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा आणखी एक तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली जाण्याने पिंपरी-चिंचवड पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.

जावेद यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील आहे. त्यांचे वडील पुण्यात आल्यानंतर जावेद यांचा जन्म पुण्यातच झाला. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले जावेद 2010 मध्ये पुणे शहर पोलीस दलात भरती झाले. सुरुवातीची 8 वर्षे त्यांनी हडपसर आणि मुंढवा पोलीस ठाण्यांमध्ये काम केले. 2018 मध्ये स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर ते या दलात आले. पिंपरी पोलीस ठाण्यात सेवा केल्यावर त्यांची गुन्हे शाखेत नेमणूक झाली होती आणि सध्या ते अमली पदार्थ विरोधी पथकात तत्परतेने काम करत होते. कर्तव्यदक्ष आणि संयमी पोलीस अशी त्यांची ओळख होती.

जावेद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने बागसिराज कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी (26 ऑक्टोबर) दुपारी पुण्यातील कसबा पेठ येथील कब्रस्तानात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

#पुणे#PT24#Pune

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ