पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे अडचणीत; उमेदवारी रद्द करण्यासाठी विरोधक कोर्टात जाणार
वयाच्या पात्रतेवरून भाजपचे उमेदवार गावडे यांच्याविरोधात याचिका दाखल होणार असून, सातारा जिल्ह्यात महायुतीतील कलहही समोर आला आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजपच्या या दोन्ही उमेदवारांसाठी बैठका सुरू आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेतेही प्रचारासाठी सगळीकडे फिरत आहेत आणि वेगवेगळ्या संघटनांचा पाठिंबा मिळवत आहेत.
असे असतानाच शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटाने या मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार दिल्यानंतर आता गावडे अडचणीत सापडले आहेत.
विरोधकांचा दावा असा आहे की गावडे यांचे वय 29 आहे, तर ही निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्षांची पात्रता लागते. मतदारयादीत त्यांचे वय 29 नोंदवलेले आहे. मात्र आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गावडे यांनी आपले वय 30 वर्षे दाखवले आहे, असेही विरोधकांचे म्हणणे आहे. म्हणजेच मतदारयादी आणि प्रतिज्ञापत्र यांतील वयात फरक असल्याकडे विरोधक बोट दाखवत आहेत.
त्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे. त्यांची उमेदवारी रद्द करावी आणि गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या याचिकेत केली जाणार आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप गावडे यांच्यावर करण्यात आला आहे. पुणे मतदारसंघातील न्यू रासपचे उमेदवार प्रा. राघू तथा आर.वाय घुटुकडे हे न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत.
दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे. महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांना राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी अजून स्पष्ट पाठिंबा दिलेला नाही.
साताऱ्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार धैर्यशील कदम गैरहजर राहिले. उदयनराजे भोसले मेळाव्याला उपस्थित होते, पण त्यांनी बोलणे टाळले. या सगळ्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महायुतीतील समन्वयाचा अभाव आणि विसंवाद यांचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व राजकीय घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.