पुणे पदवीधरमध्ये वारे फिरले? शिंदे सेनेचा अपक्ष आंधळकरांना पाठिंबा, सामंतांच्या भेटीने चर्चा
मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता नवीन वळण येण्याची शक्यता बोलली जात आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात जे घडले, त्यानंतर पदवीधर मतदारसंघातही वारे फिरू शकते, अशी चर्चा आहे. एका भेटीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ही भेट कोणाची आणि कोणाकडे झाली, त्याचा तपशील पुढे आहे.
भाऊसाहेब आंधळकर हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून ते पदवीधर मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी असा दावा केला आहे की, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचा मला पाठिंबा आहे. मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच आंधळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. त्या भेटीनंतरच आंधळकर यांनी हा दावा केला. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे.
शिक्षक मतदारसंघात महायुतीचे गाडे मैत्रीपूर्ण लढतीपर्यंत येऊन ठेपले होते. पुण्यात शिंदे सेनेने भाजपच्या विरोधात दंड थोपटले. मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघात अर्ज मागे घेतला खरा, पण सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिंदे सेनेने हिशेब चुकता करण्याची संधी सोडली नाही. शिक्षक मतदारसंघात जी खेळी झाली, तीच पदवीधरमध्येही शिंदे शिवसेना खेळणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांचे नाव सांगितले जाते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षदा देशमुख-जाधव पदवीधरच्या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघात प्रा. जयंत आसगावकर हे मविआचे उमेदवार आहेत. या दोन्ही मतदारसंघांत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे जिल्हे येतात. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच महायुतीतला अंडरकरंट समोर येत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीने एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून पुण्यातले वातावरण ढवळून काढले आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरोधात भाजप, असे समीकरण तयार झाले आहे. अशा वेळी शिंदे सेनेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. उमेदवार भाजपचा असला तरी महायुतीतील घटक पक्षांनी वेगळाच सूर लावल्यामुळे पक्षासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मंत्री उदय सामंत यांच्या भेटीमुळे शिंदे सेनेने आंधळकर यांना पाठिंबा दिल्याचे मानले जात आहे. याबाबत अजून अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. तरीही ताज्या घडामोडींमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.