पुणे पदवीधर मतमोजणी केंद्रावर मतपेट्यांच्या सीलवरून गोंधळ; सपकाळ म्हणतात, "लोकशाहीचा सरळसरळ खून"
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काही मतपेट्यांचे सील तुटलेले असल्याचा दावा करण्यात आला आणि तिथे मोठा गोंधळ उडाला. राज्यभर विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सकाळपासूनच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच मतमोजणीदरम्यान पुण्यातून ही मोठी बातमी समोर आली आहे.
मंगळवारी, 27 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. पण पुणे पदवीधर मतदारसंघाच्या केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच काही मतपेट्यांच्या सीलचा मुद्दा उपस्थित झाला.
महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करून आक्षेप घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यात वाद झाला. या गोंधळामुळे काही काळ मतमोजणी प्रक्रिया थांबवावी लागली, असे सांगितले जात आहे.
या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि निवडणूक प्रशासनावर गंभीर आरोप केले. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट 'X' वर पोस्ट करून त्यांनी संताप व्यक्त केला. सात ते आठ मतपेट्यांचे सील तुटलेले आढळल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.
सपकाळ म्हणाले, "पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मोजणी केंद्रावर ७ ते ८ मतपेट्यांचे सील तुटलेला आढळणे हा लोकशाहीचा सरळसरळ खून आहे. सील नसलेल्या संशयास्पद पेट्या बाजूला ठेवून निष्पक्ष तपासणी करण्याऐवजी, निवडणूक अधिकारी बळजबरीने आणि अरेरावी करत मोजणी रेटून नेत आहेत; प्रतिनिधींना लेखी तक्रार करू न देणे हा प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदार आणि मनमानी कारभार आहे."
पुढे ते म्हणाले, "हा उघडउघड चाललेला सावळागोंधळ महाविकास आघाडी कदापि खपवून घेणार नाही. निवडणूक आयोगाच्या या हुकूमशाही आणि संशयास्पद भूमिकेविरोधात तीव्र संताप उसळला असून, सील तुटलेल्या पेट्यांची तातडीने स्वतंत्र चौकशी करून कारवाई झाली नाही, तर अन्यथा लोकशाहीप्रेमी जनतेच्या रोषाला आणि तीव्र जनक्षोभाला सामोरे जावे लागेल."
मतपेट्यांच्या सीलसंदर्भातील आरोप गंभीर आहेत, तरी त्यांची अधिकृत चौकशी आणि पडताळणी होणे आवश्यक आहे. निवडणूक प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते आणि तक्रारीची नोंद घेऊन कोणती पावले उचलते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.