सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 321 | Very Poor 08:35 IST

पुण्यातील पदवीधर, शिक्षक मतदानात पैसेवाटपासाठी स्पायकॅम पेनचा वापर? सुप्रिया सुळेंचा आरोप

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील पदवीधर, शिक्षक मतदानात पैसेवाटपासाठी स्पायकॅम पेनचा वापर? सुप्रिया सुळेंचा आरोप छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान सुरू आहे. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असून नागपूर आणि पुण्यात मतदार रांगा लावून मतदान करत आहेत. निवडणुकीत कुठलीही गडबड होऊ नये म्हणून सगळे पक्ष डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. अशातच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सुळे यांनी ट्विट करून सांगितले की, पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून पैसेवाटपासाठी स्पायकॅम असलेल्या पेनचा वापर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मतदारांच्या खिशाला असा पेन लावायचा, त्यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि मतदानानंतर तो दाखवल्यावर ठरलेले पैसे द्यायचे, असा प्रकार सुरू असल्याचे मतदार सांगत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

या तक्रारी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहेत, असे सुळे यांचे म्हणणे आहे. मतदानाची गोपनीयता आणि मतदारांचे स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या या प्रकाराची निवडणूक आयोगाने आणि शासनाने तातडीने दखल घ्यावी, सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेता कामा नयेत. निवडणूक निष्पक्ष, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडलीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सुळे यांनी दुसरे ट्विट करून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्याकडेही बोट दाखवले. पुणे शिक्षक मतदारसंघातील गावडे यांचा मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मतदान केंद्रावर पक्षाची ओळख बाजूला ठेवून सामान्य मतदार म्हणून जाणे अपेक्षित असते, आणि लोकशाहीच्या या प्रक्रियेचे पावित्र्य तसेच मतदान केंद्राची निष्पक्षता प्रत्येकाने जपली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

उमेदवाराला पक्षाचे चिन्ह गळ्यात घालून मतदान केंद्रात प्रवेश कसा दिला, अशी विचारणा सुळे यांनी केली. ही सवलत फक्त सत्ताधारी उमेदवारालाच का दिली जाते, हा आदर्श आचारसंहितेचा भंग नाही का, आणि संबंधित उमेदवारावर नेमकी काय कारवाई करणार, याचे उत्तर महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. स्पायकॅम म्हणजे काय असते, ते आपल्याला माहीत नाही आणि आपण तो कधी पाहिलेला नाही, असे ते म्हणाले. असे काही असेल तर सुप्रिया सुळे यांनी ते आपल्याकडे पाठवावे, जरूर चौकशी करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही आरोपावर भूमिका मांडली. सुळे या खासदार आहेत, त्यामुळे स्पाय कॅमेरा असेल तर तो तपास यंत्रणांकडे किंवा माध्यमांकडे द्यावा, असे ते म्हणाले. मतदार घराबाहेर पडू नयेत म्हणून त्यांना घाबरवण्याचा हा प्रयत्न नाही ना, असा सवाल करत त्यांनी जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा केला. एक जरी कॅमेरा सापडला तर स्वतः पाहणी करा, विनाकारण हवेत गोळीबार करू नका, असेही बन म्हणाले. पदवीधर आणि शिक्षक बाहेर पडले तर ते भाजप आणि महायुतीला मतदान करणार आहेत, म्हणून घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे, असे बन यांनी म्हटले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ