अजित पवारांनी विलिनीकरणाची कल्पना दिली होती, असे तटकरे म्हणाले; अनिल देशमुखांचा सवाल
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना सुनील तटकरे यांच्या विधानावर अनिल देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल रात्री राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली आणि तासभर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एक विधान केले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाची कल्पना दिली होती, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. त्यांचे हे विधान समोर येताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी तटकरे यांना चांगलेच फटकारले आहे. देशमुख म्हणाले, अजितदादांनी विलिनीकरणाची तारीख ठरवली होती. विलिनीकरण होणार होते, हे आम्ही तेव्हा सांगत असताना तुम्ही ते नाकारत का होता? आता कोणत्या हेतूने विलिनीकरणाबद्दल बोलत आहात, असा सवाल त्यांनी केला.
माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या. दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजेत, अशी चर्चाही झाली होती. या बैठका झाल्या होत्या, असे आम्ही तेव्हा सांगत होतो, असे देशमुख यांनी सांगितले.
पण तेव्हा अशी काही चर्चाच झाली नाही, अजितदादांनी वेगळ्या कारणांनी बैठका घेतल्या होत्या, असे सुनील तटकरे सांगत होते, असे देशमुख यांनी म्हटले. अजितदादा मला कधीच विलिनीकरणाबाबत बोलले नाहीत, असेही तटकरे तेव्हा सांगत होते, असे ते म्हणाले. आता तटकरेंना अचानक काय झाले, असा प्रश्न विचारत देशमुख म्हणाले की, त्यावेळी तुम्ही चर्चाच नाकारत होता. तेव्हा तुम्ही कुणाचा अजेंडा राबवत होता हे माहीत नाही. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही असे बोलत होता आणि आता वेगळी भूमिका का घेतली आहे, असेही सवाल त्यांनी केले.
विलिनीकरणाबाबत तटकरेंना आजच का वाटू लागले आहे, असा प्रश्न देशमुख यांनी विचारला. दोन्ही पक्षांची बैठक झाल्याचे तेव्हाच का सांगितले नाही, असेही ते म्हणाले. आम्ही फोटोही दाखवले होते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या पक्षात काही नवीन बदल होणार असतील किंवा काही घडत असेल, त्यामुळे ते बोलत असतील, असे देशमुख म्हणाले. १२ फेब्रुवारीला आम्ही एकत्र येणार होतो आणि तारीखही ठरली होती, पण तेव्हा तटकरेंनी विरोध केला होता, असे त्यांनी सांगितले. आज त्यांना अचानक काय झाले, असा सवाल त्यांनी पुन्हा केला.
सध्याच्या परिस्थितीत दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही, असे देशमुख यांनी सांगितले. आता एकत्र येणे सोपे नाही, असेही ते म्हणाले. जेव्हा एकत्र येण्याचे ठरले होते, तेव्हा दादांच्या निधनानंतर याच लोकांनी विरोध केला होता, असे सांगतानाच, त्यांच्या पक्षात अंतर्गत काय सुरू आहे हे माहीत नाही, तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.