शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

विलिनीकरणाच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीत हालचाली, दोन भेटी आणि एका फोनची चर्चा

विलिनीकरणाच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीत हालचाली, दोन भेटी आणि एका फोनची चर्चा
शरद पवार | फाइल फोटो | Hindustan Times
राजकारण PT24 राजकारण डेस्क

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या, असं सुनील तटकरे यांनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अजितदादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या एका वक्तव्यानं आज राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत बैठका झाल्या होत्या आणि अजित पवार यांनी त्याची कल्पना मला दिली होती, असं तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशी चर्चा आता रंगली आहे.

गेल्या आठ दिवसांत राष्ट्रवादीत चार गोष्टी घडल्या आहेत, आणि त्यांचा संदर्भ घेऊन तटकरे यांनी हा विषय काढल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेतला पराभव, दोन राजकीय भेटी आणि एका सर्वोच्च नेत्याचा फोन, अशा या चार घटना आहेत.

सुरुवात विधान परिषद निवडणुकीपासून झाली. या निवडणुकीत अजितदादा गटाचा मोठा पराभव झाला, तर शरद पवार गटाला शंभर टक्के यश मिळालं. यामुळे शरद पवार यांच्या गटावर जनतेचा विश्वास असल्याचं अधोरेखित झालं आणि अजितदादा गटात नेतृत्वाची पोकळी असल्याचं उघड झालं, असं म्हटलं जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला पुढे नेणारा आणि राजकीय स्ट्रॅटेजीत पक्का असलेला नेता राष्ट्रवादीत उरलेला नाही, असंही बोललं जातंय. निकालानंतर प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. सक्षम नेतृत्व नसेल तर पक्षाला चांगले दिवस येणार नाहीत आणि पक्ष विखरायला वेळ लागणार नाही, असं अजितदादा गटातील नेत्यांना वाटतं, असं सूत्रांनी सांगितलं.

पहिली भेट गेल्या आठवड्यात झाली. राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय आम्ही विलिनीकरणाची चर्चा करणार नाही, अशी हमी या नेत्यांनी शाह यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. पार्थ पवार यांचा पक्षातला हस्तक्षेप वाढतोय, अशी तक्रारही त्यांनी शाह यांच्याकडे केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. या भेटीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आणि समीर भुजबळ गेले होते. सुनेत्रा पवार यांना या भेटीची माहिती नव्हती. त्यावरून पक्षात सगळं आलबेल नसल्याचं दिसलं होतं. त्यानंतर लगेच तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केल्यानं त्यांच्या विधानाचा संबंध शाह यांच्या भेटीशी जोडला जात आहे.

त्यानंतर एक फोन आला. शरद पवार पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला आणि तब्येतीची विचारपूस केली. काळजी घेण्याचा सल्लाही दिला. "सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळतो. तुम्ही काळजी करू नका. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत बरे व्हा," असं मोदी पवारांना म्हणाले. या वाक्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पवार एनडीएसोबत जाणार का आणि त्यापूर्वी राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का, अशी चर्चा सुरू आहे.

दुसरी भेट पवार मुंबईत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर झाली. काल प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेतली आणि तासभर चर्चा केली. दहा तारखेला भेटू, असं पवारांनी पटेलांना सांगितलं. त्यामुळे दहा तारखेला नेमकं काय होणार, याबद्दल उत्सुकता आहे. पटेल दुसऱ्या पक्षात असताना आणि पवार आजारी असताना कोणत्या विषयावर चर्चा झाली, विलिनीकरणाचा फॉर्म्युला ठरला का, असे प्रश्न विचारले जात आहेत. पटेल यांच्या भेटीनंतरच तटकरे यांनी विलिनीकरणावर भाष्य केलं. हे राजकीय संकेत काय आहेत आणि पुढे कोणत्या घडामोडी घडणार, हे दहा तारखेनंतरच स्पष्ट होईल, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

#मुंबई#सियासत#PT24#Politics#Mumbai

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ