पवार कुठेही जाणार नाहीत, आमच्यासोबतच राहतील; एनडीए चर्चेवर संजय राऊत यांचं उत्तर
शरद पवार एनडीएसोबत जाणार या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. हसन मुश्रीफ, गोकुळ आणि राज्यपालांच्या सहीबाबतही त्यांनी भाजप व फडणवीस यांच्यावर टीका केली.
ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन केला होता. त्या वेळी मोदी यांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला आणि सुप्रिया सुळे व आम्ही देश सांभाळू, असं म्हटलं आहे.
त्यानंतर लगेचच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या वावड्या उठल्या आहेत. पवार पुन्हा एनडीएसोबत जाणार, अशी चर्चा रंगली आहे.
या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना एका वाक्यात उत्तर दिलं. शरद पवार कुठेच जाणार नाहीत, ते आमच्यासोबतच राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राऊत म्हणाले, "शरद पवार कुठे जाणार नाहीत. मी खात्रीने सांगतो. प्रफुल्ल पटेल यांना काही म्हणू द्या. पवार कुठे जाणार नाहीत. ते आमच्यासोबतच राहतील. पुरोगामी महाराष्ट्राचं नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. कुणी गमजा मारत असतील तर त्या खोट्या आहेत. ते आमच्यासोबत राहतील आणि आम्हाला आशीर्वाद देत राहतील."
ईडीने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना क्लिनचिट दिली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आता किरीट सोमय्यांनी अटल सेतूवरून उडी मारावी, फडणवीस यांनी त्यांचं थोबाड फोडलं आहे, असं ते म्हणाले. सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्या दारात उपोषणाला बसावं, तसंच ईडीच्या दारातही बसावं, असं राऊत यांचं म्हणणं आहे. ज्यांच्या विरोधात ईडीचे खटले केले आणि आंदोलन केलं, ते सगळे भाजपमध्ये गेले आणि भाजपने त्यांना क्लिनचिट दिली, असा त्यांचा आरोप आहे. त्यांच्यापुढे आता एकच काम उरलं आहे, या नेत्यांच्या दारात जाऊन उपोषण करणं, असं राऊत म्हणाले. सोमय्यांचा फोटो पाहिला, त्यांचा चेहरा काळा पडला आहे, दात पडले आहेत, असंही ते म्हणाले. भाजपने आता हसन मुश्रीफ यांचा फोटो लावावा आणि त्यांच्या नावाचं एक पदक सोमय्यांच्या छातीवर लावावं, असा हल्लाच राऊत यांनी चढवला.
गोकुळच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी सरकारवर टीका केली. गोकुळच्या बैठकीला 14 चा कोरम लागतो, पण लोकांनी कौल दिला आहे. तो कोरम पूर्ण होऊ नये म्हणून फडणवीस यांनी समविचारी पॅनलच्या दोन जागा चोरल्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. शेवटच्या क्षणी पाच-सहा मतांनी निर्णय फिरवले गेले, असं ते म्हणाले. समजा महाडिकांच्या पॅनलला 13 जागा आणि सतेज पाटलांना 12 जागा मिळाल्या असत्या, तर हा निर्णय घेतला असता का, पाच सदस्य नेमण्याचा निर्णय फडणवीस यांनी घेतला असता का, असा सवाल त्यांनी केला. तेव्हा बहुमत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं असतं, पण तुम्ही पराभूत झालात, लोकांनी तुम्हाला पराभूत केलं आहे, मग त्यांना शासकीय सदस्य म्हणून घेता हा काय प्रकार आहे, असं राऊत म्हणाले. फडणवीस यांनी आपली प्रतिमा आणखी डागाळू देऊ नये, ती खूप डागाळली आहे, इतकी काळीकुट्ट करू नये की लोकांनी तुम्हाला ओळखूच नये, अशी टीका त्यांनी केली.
लोकशाहीची चाड आणि जनमताची चाड असेल तर राज्यपाल त्या अध्यादेशावर सही करणार नाहीत, असं राऊत म्हणाले. सध्याच्या राज्यकर्त्यांनी लाज, लज्जा, शरम यांची कसलीही फिकीर न करता जनमताचा कौल फेटाळून लावला आहे, म्हणूनच लोकशाही धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो, असं ते म्हणाले. फडणवीस इतक्या खालच्या थरावर जातील याची कल्पना नव्हती, चंद्रकांत पाटलांचं एकवेळ समजू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. फडणवीस यांच्या वडिलांनी आणीबाणीविरोधातील संघर्षात भाग घेतला असा ते दावा करतात, आता मला त्यावरच शंका यायला लागली आहे, असं राऊत म्हणाले. गंगाधर फडणवीस लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी लढत असतील, तर त्यांचे चिरंजीव फडणवीस लोकशाहीने दिलेला कौल चिरडून टाकू शकत नाहीत. हा त्यांच्या वडिलांच्या संघर्षाचा आणि त्यागाचा अपमान ठरेल, असं राऊत म्हणाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.