शरद पवार सोलापूरच्या दुष्काळ दौऱ्यावर; तुळशी गावात ५० लाखांची मदत जाहीर
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा तालुक्यातील तुळशी गावात शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सोलापूरच्या दुष्काळासाठी ५० लाख रुपयांचा धनादेश दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून केली. माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा त्यांनी आज आढावा घेतला. हा तोच लोकसभा मतदारसंघ आहे, जिथून पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
या दौऱ्यात पवार तुळशी गावातही गेले. काही दिवसांपूर्वी याच गावातील शेतकऱ्यांनी गाव विकायला काढल्याचे बॅनर झळकावले होते. माजी केंद्रीय कृषीमंत्री असलेले पवार आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी बोलताना दिसले.
तुळशी गावातील पाणीटंचाईची माहिती घेतल्यानंतर पवार यांनी स्वत:कडून ५० लाख रुपयांची मदत देऊ केली. सोलापूरच्या दुष्काळी परिस्थितीसाठीचा हा ५० लाखांचा धनादेश त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
पवार यांनी १९७२ सालच्या दुष्काळाची आठवण सांगितली. तेव्हाही असाच दुष्काळ होता आणि आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होतो, असे त्यांनी सांगितले. त्या काळात सरकारकडून शेतकऱ्यांना जमेल तेवढी मदत आम्ही केली होती, असेही ते म्हणाले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही पवार यांनी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येतील, तेव्हा खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना शेतकऱ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी वेळ देणार असल्याचे पवार यांनी म्हटले. मराठवाड्याचा दुष्काळी दौरा झाल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. दुष्काळावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, हे एक महिन्यापूर्वीच आपण मुख्यमंत्र्यांना लेखी दिले होते, असे पवार यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील तुळशी गाव काही दिवसांपूर्वी राज्यभर चर्चेत आले होते. ग्रामस्थांनी "तुळशी गाव विकणे आहे" असे पोस्टर लावले होते. गावातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे पोस्टर लावले. पाणीटंचाई आणि दुष्काळामुळे गावावर आलेल्या संकटाची तीव्रता त्यातून मांडण्यात आली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो बॅनर काढण्यात आला होता. आता खुद्द शरद पवार यांनी आज तुळशी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. स्वत: मदत करतानाच, या मदतीसाठी सरकारशीही बोलणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.