राष्ट्रवादीतील गोंधळावर अमित शाह नाराज, सूत्रांची माहिती; सुनेत्रा पवारांची आमदारांची बैठक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेमणुकांच्या वादाची तक्रार दिल्लीत पोहोचल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. उमेश पाटील यांनी ही भेट पूर्वनियोजित होती, असे म्हटले आहे.
अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह अनेकदा उघडपणे समोर आला आहे. पक्षासमोरच नव्हे, तर मित्रपक्षाच्या शीर्ष नेत्यांसमोरही राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे.
याआधी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि पवार कुटुंबीयांमधील वाद समोर आला होता. आता पार्थ पवार यांच्या भूमिकेवरून हा वाद पुन्हा उफाळला आहे. राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्षपदावर झालेल्या नेमणुकांवरून ठिणगी पडली आहे. हा सगळा वाद आता दिल्लीपर्यंत पोहोचला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याबद्दल तक्रार केली आणि त्यानंतर दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीत शाह यांनी राष्ट्रवादीतील गोंधळावर नाराजी व्यक्त केली. या गोंधळाचा सरकारवर परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.
झिशान सिद्दिकी आणि इतर नेमणुकांवरून राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. आपल्याला या नियुक्त्यांबद्दल माध्यमांतून कळले, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली. पार्थ पवार यांच्या निर्णयाविरोधात हे नेते नाराज झाले आणि त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या भेटीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याबद्दल तक्रार करण्यात आली. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ता आणि इतर पदांवर नियुक्ती करताना वरिष्ठ नेत्यांना डावलले गेले, असा तक्रारीचा सूर होता.
त्यानंतर छगन भुजबळ यांच्या घरी बैठक झाली. पुन्हा कोअर कमिटीचीही बैठक झाली आणि त्यात वरिष्ठ नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. सूत्रांनी सांगितले की, पक्षातील वादाचा सरकारवर परिणाम होत आहे, असा स्पष्ट निरोप देवगिरीला कळवण्यात आला. काल झालेल्या बैठकीला सुनील तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर नेते उपस्थित होते.
दिल्लीतील नाराजीचे पडसाद आता मुंबईतही उमटू लागले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या चार महिन्यांनंतर अशी बैठक होत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या या बैठकीला त्यामुळे महत्त्व आले आहे. ही बैठक आज संध्याकाळी सात वाजता देवगिरी बंगल्यावर होणार आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले की, दिल्लीत पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली अमित शाह यांची भेट पूर्वनियोजित होती. काही लोक मुद्दाम पक्षात दुफळी निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादीत वाद असल्याचा खोडसाळपणा करत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.