अजितदादांची राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आक्रमक; प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अर्थ खात्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राज्यातल्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वर्षा निवासस्थानी पोहोचले. अर्थ खात्याची मागणी घेऊनच हे सगळे नेते मुख्यमंत्र्यांकडे गेल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतर वर्षा निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती हाती आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. राजकीय वर्तुळात या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे.
या भेटीआधी आज सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ही बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी पार पडली. तब्बल दीड महिन्यानंतर कोअर कमिटीची बैठक झाली, हे विशेष. बैठकीत आधी पक्षसंघटनेचा आढावा घेतला गेला, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पक्षातल्या बदलांबद्दल चर्चा झाली.
सध्या भाजपकडे असलेल्या अर्थ खात्याचा विषयही बैठकीत निघाला, असे बोलले जात आहे. कोअर कमिटीची बैठक संपल्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटायला वर्षा निवासस्थानी गेले. सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ हेही या भेटीला उपस्थित होते. राष्ट्रवादीने अर्थ खात्याची मागणी केल्यामुळे आजच्या भेटीला वेगळे महत्त्व आले आहे.
मंत्री अनिल पाटील म्हणाले, "आज कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सर्व जण मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला गेले. संपूर्ण राज्यात जे धोरण ठरलं होतं, त्यानुसार तिन्ही पक्षांनी सरकार स्थापन करताना कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं असेल हे ठरवलं होतं. परंतु दादांच्या दुर्दैवी घटनेनंतर अपेक्षा आहे की, जे काही ठरलं आहे ते मिळायला पाहिजे, अशा अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत."
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने यापूर्वीही अर्थ खाते परत मिळावे, यासाठी प्रयत्न केले होते. आता पक्षाचे वरिष्ठ नेतेच या खात्यासाठी आक्रमक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमके काय ठरते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.