शरद पवार रुग्णालयात: प्रफुल्ल पटेल यांच्यानंतर सुनेत्रा पवार भेटीला, राहुल गांधींचाही फोन
ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक नेते आले, तर राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी फोन केला.
ज्येष्ठ नेते शरद पवार गेल्या दोन दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना कफ झाला असून थकवाही जाणवत होता, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात नेत्यांची रांग लागली आहे.
काल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्या वेळी पवार यांनी पटेल यांना, 11 तारखेनंतर भेटू, असे सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याही पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात गेल्या आहेत.
सुनेत्रा पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्या असून शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्या आल्या आहेत. कालच प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांची भेट घेतली होती आणि आज सुनेत्रा पवार त्यांना भेटत आहेत. म्हणजेच पटेल यांच्यानंतर आज सुनेत्रा पवार भेटीला आल्या आहेत. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या भेटीत राजकीय चर्चा होण्याचे संकेतही मिळत आहेत.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनीही शरद पवार यांना फोन करून प्रकृतीची चौकशी केली. पवार पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार घेत असतानाही राहुल आणि प्रियांका गांधी यांनी फोन करून चौकशी केली होती, असे सूत्रांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली आहे.
आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही रुग्णालयात जाऊन पवार यांची भेट घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हेही पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आले आहेत. अशा प्रकारे वेगवेगळ्या पक्षांतील नेते पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात येत आहेत.
शरद पवार यांची प्रकृती आता ठीक आहे. त्यांना आज रात्री किंवा उद्या सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चार दिवसांपूर्वी पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुबी रुग्णालयात ते दोन दिवस होते. दोन दिवस उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पवार थेट मुंबईत सिल्व्हरओक या निवासस्थानी आले होते. पण तब्येत पुन्हा बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.