शाहांसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची पार्थ पवारांबद्दल नाराजी, सूत्रांची माहिती
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
दिल्लीत अमित शाह यांना भेटलेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आज संध्याकाळी सुनेत्रा पवारांनी आमदारांची बैठक बोलावली आहे.
सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवी दिल्लीतल्या भेटीगाठी थांबायचे नाव घेत नाहीत. रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. मंत्रिमंडळातले संभाव्य फेरबदल आणि अर्थखात्याची मागणी यासाठी ही भेट झाल्याची माहिती आहे.
सुनील तटकरे, प्रफुल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि धनंजय मुंडे या वरिष्ठ नेत्यांनी रविवारी रात्री नऊ वाजता शाह यांची भेट घेतली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. नेत्यांनी अर्थखात्याचा मुद्दा शाह यांच्यासमोर मांडला. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र नकोतच, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते.
या बैठकीला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार दोघेही हजर नव्हते. भेटीचे फोटो बाहेर आले, तेव्हा त्यात या दोघांचा समावेश नव्हता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवारांबद्दलची तक्रार हाच बैठकीचा मुख्य अजेंडा होता.
सूत्रांनी सांगितले की, पक्षातील प्रमुख पदांवर पार्थ पवारांनी केलेल्या नेमणुका, प्रमुख नेत्यांना वगळून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी साधलेला संवाद, तसेच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील स्थानाबद्दलचा संभ्रम, या मुद्द्यांवर तक्रार करण्यात आली.
झिशान सिद्दीकी यांची मुंबई अध्यक्षपदी आणि उमेश पाटील यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड करताना कोअर कमिटी आणि वरिष्ठ नेत्यांना विचारणे अपेक्षित होते, असे नेत्यांचे म्हणणे असल्याचे समजते. पण तसे काहीच झाले नाही, अशी त्यांची भावना आहे. पार्थ पवारांकडून याआधीही अशा नियुक्त्या झाल्या आहेत. अनेक पदांवर त्यांनी आपल्या विचारांचे आणि गटातले लोक बसवले आहेत, यावरून वरिष्ठ नेत्यांची फळी सध्या नाराज असल्याचे सांगितले जाते.
शाह यांच्या भेटीनंतर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. तीही पार्थ पवारांशिवाय पार पडली. तिथेही पार्थ पवारांची कार्यपद्धती हा चर्चेचा विषय होता. सर्वांना सोबत घेऊन आणि अनुभवी नेत्यांशी बोलून पुढचे निर्णय घ्यावेत, अशी भूमिका नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चर्चेनंतर पार्थ पवार आणि जय पवार या दोघांना वरिष्ठ नेत्यांशी समन्वय ठेवून काम करायला सांगू, असे आश्वासन देण्यात आल्याचेही सांगितले जाते.
याच दरम्यान सुनील तटकरे यांनी पक्षात कुठेही नाराजी नाही आणि दिल्लीतील बैठक नियोजित होती, अशी माहिती दिल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक आधीच ठरलेली होती आणि त्यात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा अपेक्षित आहे. मात्र रविवारी दिल्लीत झालेली भेट आणि सोमवारच्या कोअर कमिटी बैठकीनंतर, देवगिरी बंगल्यावरच्या या बैठकीत सुनेत्रा पवार काय बोलणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.