लोअर परळ बीडीडी चाळीतील 557 रहिवाशांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरांच्या चाव्या
लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकासातील 557 पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पात्र रहिवाशांना 160 चौरस फुटांऐवजी 500 चौरस फुटांचे 2 बीएचके घर विनामूल्य मिळाले.
अनेक वर्षे हक्काच्या घराची वाट बघणाऱ्या बीडीडी चाळीतील रहिवाशांची अखेर वणवण संपली आहे. लोअर परळ येथील बीडीडी चाळ पुनर्विकासातील 557 पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. घरांच्या चाव्या हातात आल्यामुळे या रहिवाशांची दिवाळी गोड झाली आणि सरकारकडून मिळालेले हे सर्वात मोठे गिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. पात्र रहिवाशांना मालकी हक्काची सदनिका विनामूल्य मिळाली असून, 160 चौरस फुटांच्या जागी आता त्यांना 500 चौरस फुटांचे घर मिळाले आहे.
ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जागा 13.49 एकर आहे. तिथे तळ अधिक 3 मजल्यांच्या 32 चाळी होत्या आणि त्यात 160 चौरस फुटांच्या सदनिकांमध्ये 2560 भाडेकरू/रहिवासी राहत होते. दोन ते तीन पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची, सर्व सोयींनी युक्त 2 बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामूल्य दिली आहे.
या सदनिकांमध्ये व्हिट्रीफाईड टाईल, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकाचा ओटा, अग्निरोधक यंत्रणा आणि ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स अशा सुविधा आहेत. इमारती भूकंपरोधक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. प्रत्येक इमारतीत दोन पॅसेंजर लिफ्ट आणि एक फायर लिफ्ट असून सुरक्षेसाठी प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही बसवले आहेत. प्रकल्पात 3 मजल्यांचे बेसमेंट पार्किंग, स्टील्ट एरिया, एक पोडियम आणि प्रशस्त जिने आहेत.
हा पुनर्विकास दोन टप्प्यांत होत आहे. त्यात 22 मजल्यांच्या पुनर्वसन इमारतींचे 14 विंग उभारले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 7 विंग आणि एक हॉस्पिटल इमारत आहे. यातील 3 विंगमधील 557 सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. उरलेल्या 4 विंगमधील 684 सदनिकांचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारी 2026 मध्ये ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूण भूखंडापैकी सुमारे 65 टक्के जागा पुनर्वसनासाठी वापरली आहे.
दुसऱ्या टप्प्यातील 15 चाळींमधील 1200 गाळेधारकांची पात्रता निश्चित झाली आहे. पात्र रहिवाशांना दरमहा 39 हजार रुपये संक्रमण भाडे दिले जाते.
मुंबईतील वरळी, लोअर परळ आणि नायगाव येथील 195 चाळींचा पुनर्विकास 86 एकर जागेवर होत असून त्यात 15 हजार 593 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. वरळीत आतापर्यंत 1975 सदनिकांचे आणि नायगावमध्ये 1401 सदनिकांचे वितरण झाले आहे. आता लोअर परळमधील 557 सदनिकांचे वितरण झाले.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.