मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:04 IST

चंद्रपुरात डॉल्बी, प्लाझ्मा साऊंड सिस्टिमवर १ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध, जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमवर बंदी घातली आहे.

चंद्रपुरात डॉल्बी, प्लाझ्मा साऊंड सिस्टिमवर १ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध, जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

चंद्रपूर जिल्ह्यात डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टिमच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सव या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

हा आदेश १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून लागू झाला असून १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कायम राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच दुर्गामूर्तींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका यांसह अनेक उत्सव आणि कार्यक्रम होणार आहेत. अशा कार्यक्रमांमध्ये काही ठिकाणी डॉल्बी साऊंडचे टॉप, मिड आणि बेस असे मल्टीस्पीकर एकावर एक थर रचून भिंतीसारखी रचना उभारली जाते आणि त्यासाठी वाहनांमध्ये बदल करून त्यांचा वापर होण्याची शक्यता प्रशासनाला वाटते आहे.

अशा उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरावरून मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी तसेच पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे आदेशात नमूद आहे. शिवाय अशा साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० यांमध्ये ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याचीही शक्यता असल्याचे आदेशात म्हटले आहे.

आदेशानुसार डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टीस्पीकर) सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम आणि अशा सिस्टिमच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी व त्यासाठी बदल केलेली वाहने यांच्या मालकांनी आणि धारकांनी ती स्वतःच्या ताब्यात सिलबंद स्थितीत ठेवावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रतिबंधात्मक कालावधीत त्यांचा कोणताही वापर करता येणार नाही. गणेशोत्सव आणि दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमांचे आयोजक यांनाही हेच निर्देश लागू राहतील.

दुसरीकडे, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये ठरवून दिलेली ध्वनी मर्यादा न ओलांडणाऱ्या साऊंड सिस्टिमना हा प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित साऊंड सिस्टिम मालक, वाहनधारक, गणेश आणि दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजक यांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ