चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी २५ सप्टेंबरला मुख्य रस्ते बंद, पर्यायी मार्ग व पार्किंग जाहीर
चंद्रपूर पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावर वाहतूक बंदी लागू केली आहे, तसेच पर्यायी मार्ग व अधिकृत पार्किंग जागा जाहीर केल्या आहेत.
चंद्रपूर शहरात २५ सप्टेंबरला होणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम ३३(१)(ब) अंतर्गत ही अधिसूचना जारी केली असून, ती २५ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात प्रियदर्शनी चौक ते जटपुरा गेट या मुख्य मिरवणूक मार्गावर सगळ्या प्रकारच्या वाहनांना पूर्ण बंदी असणार आहे.
कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक, जटपुरा गेट मार्गे रामनगर रोड आणि तिथून संत केवलराम चौक ते इरई नदीवरच्या रामसेतू पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ताही बंद ठेवला जाणार आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग ठरवले आहेत. नागपूरहून बल्लारशा किंवा मूलकडे जाणाऱ्या वाहनांना प्रियदर्शनी चौकाकडे जाता येणार नाही; ती वाहने वरोरा नाका उड्डाणपूल, सावरकर चौक ते बंगाली कॅम्प मार्गे पुढे सोडली जातील. याच पद्धतीने मूल किंवा बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी वाहनेही बंगाली कॅम्प, सावरकर चौक व वरोरा नाका नवीन उड्डाणपुलावरून नागपूरच्या दिशेने पाठवली जाणार आहेत.
नागपूरहून शहरात येणाऱ्या हलक्या वाहनांना छोटा नागपूर, दाताळा चौक, देवाळा गाव आणि चोराळा टी-पॉइंटवरून बिनबा गेट किंवा पठाणपुरा गेटमार्गे प्रवेश दिला जाईल. रहमत नगर, नगीना बाग परिसरातील रहिवाशांना नागपूर, वणी, घुग्घुस किंवा गडचांदूरकडे जाण्यासाठी बिनबा गेट आणि चोराळा-दाताळा मार्गाचा वापर करावा लागेल. बल्लारशा व मूलकडून येणाऱ्या वाहनांना बस स्टँड, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जुनोना चौकातून, तसेच प्रसन्न पेट्रोल पंपाकडून बाबूपेठ मार्गे फक्त अंचलेश्वर गेटपर्यंतच शहरात प्रवेश मिळेल.
गर्दी आणि सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी शहरातील अनेक रस्ते नो पार्किंग आणि नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केले आहेत. यात जटपुरा गेट ते कस्तुरबा चौक, जटपुरा गेट ते रामनगर रोड मार्गे रामसेतू पूल, जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक, कस्तुरबा चौक ते गांधी चौक ते जटपुरा गेट, कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट, गांधी चौक ते मिलन चौक ते जोड देऊळ, कस्तुरबा चौक ते जेल रोड चौक, दस्तगीर चौक ते मिलन चौक, मिलन चौक ते बजाज पॉलिटेक्निक कॉलेज, हिंदी सिटी हायस्कूल ते रघुवंशी कॉम्प्लेक्स, मौलाना आझाद चौक ते जयंत टॉकीज आणि छोटा बाजार चौक ते पाताळेश्वर मंदिर या भागांचा समावेश आहे. या रस्त्यांवर वाहने उभी करणे किंवा स्टॉल लावणे यावर सक्त बंदी घातली आहे. मुख्य मिरवणूक मार्गावर राहणाऱ्या ज्या रहिवाशांकडे स्वतःची पार्किंगची जागा नाही, त्यांना जुबली हायस्कूलचे पटांगण किंवा महानगरपालिकेजवळची पार्किंग वापरता येईल, पण ही वाहने मिरवणूक संपल्यानंतरच तिथून काढता येणार आहेत.
बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अधिकृत पार्किंग जागा ठरवण्यात आल्या आहेत. यात चांदा क्लब ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज (वरोरा नाका), सेंट मायकल हायस्कूल (नगीना बाग), सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौकाजवळ, रामनगर), व्यायाम शाळा ग्राउंड (पठाणपुरा चौक), डी.एड. कॉलेज ग्राउंड (बाबूपेठ) आणि महाकाली मंदिर ग्राउंड यांचा समावेश आहे. नागरिकांनी आपली वाहने शहरात न आणून याच पार्किंग जागांवर उभी करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांनी त्यांना दिलेल्या मिरवणूक क्रमांकाचे काटेकोर पालन करावे आणि सगळ्या नागरिकांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे निर्देश पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.