मूल पोलिसांची कारवाई: गणेश विसर्जन मिरवणुकीत नियमबाह्य डीजेवर २६ लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करत सहा जणांवर गुन्हे दाखल केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशनने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तादरम्यान नियम मोडून कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली आहे. आलेवाही आणि नवेगाव आलेवाही या दोन ठिकाणी स्वतंत्रपणे झालेल्या कारवायांमध्ये ध्वनीमापक यंत्राने तपासणी केली असता आवाजाची तीव्रता निश्चित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून साऊंड सिस्टिम, जनरेटर आणि दोन वाहनांसह एकूण २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा जणांवर भारतीय न्याय संहिता आणि पोलीस अधिनियमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके आणि पोलीस पथक आलेवाही व नवेगाव परिसरात गस्त घालत असताना परवानगीविना आणि मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता आवाजाची पातळी नियमांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले.
पहिली कारवाई आलेवाही येथील जय वाल्मीकी गणेश मंडळाच्या मिरवणुकीत झाली. येथे टाटा एलपीटी वाहनावर (क्रमांक MH-36 AA-4191) साऊंड सिस्टिम लावून ७७.०३ डेसिबल इतक्या मोठ्या आवाजात डीजे वाजवला जात होता. चौकशीत डीजे मालक व ऑपरेटर रोहित युवराज येलमुळे (वय २५, रा. सिंदपुरी, ता. पवनी, जि. भंडारा) याने हा डीजे मंडळाच्या आयोजकांच्या सांगण्यावरून वाजवत असल्याचे आणि त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. या प्रकरणी वाहनचालक भास्कर प्रल्हाद ढोरे (वय २५, रा. ईटान, जि. भंडारा), आयोजक सुरज राजू मारबते (वय २८, रा. आलेवाही) आणि रोहित येलमुळे या तिघांवर गुन्हा दाखल करून १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसरी कारवाई नवेगाव आलेवाही येथील उज्वल ज्योत गणेश मंडळाच्या मिरवणुकीत झाली. येथे टाटा ७०९ पिकअप वाहनावर (क्रमांक MH-01 BR-2461) डीजे साऊंड सिस्टिमद्वारे ७३.५० डेसिबल आवाजात ध्वनीक्षेपण सुरू होते. या प्रकरणी डीजे मालक गंगाधर सुखदेव बोरकर (वय ४२, रा. टेकरी, ता. सिंदेवाही), वाहनचालक रोशन गजानन टिकले (वय २१, रा. सायमारा, ता. सावली) आणि आयोजक वैभव धर्मराव तलांडे (वय २२, रा. नवेगाव आलेवाही) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून डीजे ऑडिओ मशीन, स्पीकर बॉक्स, टॅप, मिक्सर, जनरेटर, पॉवर सेवर आणि दोन वाहने असा एकूण २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३८ आणि १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस अंमलदार उत्तम कुमरे, नरेश कोडापे, नरेंद्र वाकडे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, प्रकाश चिकराम, गणेश आदे आणि अरविंद मेश्राम यांनी पार पाडली. आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ध्वनीमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन मूल पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.