गोंदियात कर्णकर्कश डीजेंवर पोलिसांचा हंटर, चार डीजे ऑपरेटर-मालकांवर एफआयआर, गाडी आणि साउंड सिस्टम जप्त
सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाच्या नियमांना बगल देऊन कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या चार ऑपरेटर-मालकांविरुद्ध गोंदिया शहर आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल.
गोंदिया पोलिसांनी कान फाडणाऱ्या बेसवर डीजे वाजवणाऱ्यांवर कडक भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्ट आणि बॉम्बे हायकोर्टाने डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाबाबत आधीच स्पष्ट नियम घालून दिलेले आहेत. या नियमांना बगल देऊन बेधडक कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या ऑपरेटर आणि मालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गोंदिया शहर पोलीस स्टेशन आणि रामनगर पोलीस स्टेशन या दोन्ही हद्दींमध्ये मिळून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण चार डीजे ऑपरेटरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सणांआधी नियम धाब्यावर बसवल्याने ही कारवाई महागात पडली. गोंदिया पोलीस अधीक्षकांनी सणांआधी, म्हणजे 12 सप्टेंबरला, शहरातील सर्व लाऊडस्पीकर आणि डीजे साउंड ऑपरेटरांची एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या गाईडलाईन्सचे काटेकोर पालन करण्याची स्पष्ट सूचना ऑपरेटरांना देण्यात आली होती. तरीही या सूचनांना ठेंगा दाखवत काही ऑपरेटरांनी डीजेचा डेसिबल लेव्हल ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाढवला.
याचा परिणाम म्हणजे चावडी चौक आणि छोटा गोंदिया या सार्वजनिक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवल्याप्रकरणी डीजे मालक नंदकिशोर बुधराम राऊत (वय 38, रहिवासी शास्त्री वार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यावर बीएनएसच्या कलम 223, 270, 293, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 33(1)(आर)(iii), 131, 36, 134, 37, 135, 38, 136, 102, 115 आणि पर्यावरण संरक्षण कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे रामनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी विद्यानगर (टी.बी. टोली) या भागात सार्वजनिकरित्या तीव्र ध्वनी प्रदूषण केल्याच्या आरोपाखाली आणखी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राकेश भाऊराव गजभिये (वय 41, रहिवासी छोटा गोंदिया), अंकित महेंद्र नागोसे (वय 20, रहिवासी तुमखेडा खुर्द) आणि हिरेश नंदलाल धारपिंडे (रहिवासी गोविंदपूर) यांचा समावेश आहे. या तिघांवर बीएनएसच्या कलम 270, 292, 293 आणि ध्वनी प्रदूषण नियम 2000 च्या कलम 5 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सर्व गणेश मंडळे आणि डीजे ऑपरेटरांना स्पष्टपणे आवाहन केले आहे की त्यांनी ठरलेल्या डेसिबल मर्यादेचे काटेकोर पालन करावे, जेणेकरून सामान्य नागरिक, लहान मुले आणि वृद्धांना त्रास होणार नाही. या सूचनांकडे यापुढेही जे दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर अशीच कठोर कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गोंदिया शहराचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे, रामनगरचे ठाणेदार तिरुपती राणे आणि त्यांच्या टीमने ही कारवाई प्रत्यक्षात राबवली.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.