चंद्रपूर जिल्ह्यात डॉल्बी, प्लाझमा, प्रेशरमिड साऊंड सिस्टिमवर बंदी
गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व दुर्गोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचा प्रतिबंधात्मक आदेश.
चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आणि दुर्गोत्सव या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. डॉल्बी साऊंड सिस्टिम म्हणजेच टॉप, मिड व बेस मल्टी स्पीकर, तसेच प्लाझमा साऊंड सिस्टिम आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टिम यांच्या वापरास जिल्ह्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. या साऊंड सिस्टिम वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि त्यासाठी बदल (मॉडिफाय) करण्यात आलेल्या वाहनांवरही हीच बंदी लागू राहणार आहे.
जिल्हादंडाधिकारी वसुमना पंत यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री २४ वाजेपासून हा आदेश लागू झाला असून दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत तो संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कायम राहणार आहे.
याच कालावधीत जिल्ह्यात गणेशमूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुका, गणेशोत्सव, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन तसेच दुर्गा मूर्तींचे आगमन व विसर्जन मिरवणुका असे विविध उत्सव व कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांच्या वेळी काही ठिकाणी डॉल्बी साऊंडच्या टॉप, मिड व बेस अशा मल्टीस्पीकर यंत्रणांचे थरावर थर रचून भिंतीसारखी उभारणी केली जाण्याची आणि त्यासाठी वाहनांमध्ये बदल करून ती वापरली जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.
अशा उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिमच्या वापरामुळे मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्यात तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो, असे आदेशात म्हटले आहे. शिवाय अशा साऊंड सिस्टिममुळे पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ आणि ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन होण्याचीही शक्यता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आदेशानुसार डॉल्बी साऊंड (टॉप, मिड, बेस मल्टी स्पीकर) सिस्टिम, प्लाझमा साऊंड सिस्टिम, प्रेशरमिड साऊंड सिस्टिम तसेच त्यांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी व बदल केलेली वाहने यांच्या मालकांनी आणि धारकांनी संबंधित साऊंड सिस्टिम व वाहने स्वतःच्या ताब्यात सिलबंद स्थितीत ठेवायची आहेत. प्रतिबंधाच्या या कालावधीत त्यांचा कोणत्याही प्रकारे वापर करता येणार नाही. गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन कार्यक्रमांचे आयोजक यांनाही हेच निर्देश लागू राहतील.
दरम्यान, ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) नियम, २००० मध्ये ठरवलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन न करणाऱ्या साऊंड सिस्टिमना हा प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित साऊंड सिस्टिम मालक, वाहनधारक, गणेश व दुर्गादेवी मंडळांचे पदाधिकारी तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजक यांनी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.