रमणमळा गोळीबारात हेमंत गायकवाड यांचा खून; १३ वर्षांनी तिघा सावंतांना जन्मठेप
कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट कार्यालय चौकातील २०१३ च्या गोळीबारप्रकरणी कोर्टाने राजेंद्र सावंत आणि त्यांच्या दोन मुलांना दोषी ठरवून जन्मठेप सुनावली.
कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट कार्यालय चौकात २०१३ मध्ये भरदिवसा गोळीबार करून हेमंत बाबासो गायकवाड (वय २९) यांचा खून करण्यात आला होता. तब्बल १३ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी राजेंद्र आनंदा सावंत (६३), अभिजित राजेंद्र सावंत (३२) आणि धैर्यशील राजेंद्र सावंत (३६) या पिता-पुत्रांना दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याच प्रकरणातील आणखी एक आरोपी संतोष इंगवले यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
रमणमळा परिसरात हेमंत गायकवाड आणि सावंत कुटुंबातील तरुण यांच्यात वर्चस्वावरून आणि जुन्या वादांमुळे सतत खटके उडत होते. २४ मे २०१३ रोजी रमणमळ्यातील पोस्ट कार्यालय चौकात पुन्हा वाद झाला. त्यानंतर राजेंद्र सावंत, अभिजित आणि धैर्यशील यांनी हेमंत गायकवाड यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. त्यावेळी राजेंद्र सावंत यांनी रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. हेमंत यांच्या डोक्यात गोळी लागली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत गायकवाड या गोळीबारात जखमी झाले. गोळीबारानंतर तिघेही मोटारीतून पळून गेले होते.
पोलिसांनी या प्रकरणात चार पिस्तुले जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली होती. त्यापैकी एका खासगी ९ एमएम पिस्तुलमधून गोळीबार झाल्याचे बॅलेस्टिक आणि फॉरेन्सिक तपासात स्पष्ट झाले. एकूण तीन राऊंड झाडले गेले होते. एक गोळी हेमंत यांच्या डोक्यात लागली, दुसरी गोळी नेम चुकून गेली, तर तिसरी गोळी शशिकांत यांना घासून गेल्याने ते जखमी झाले.
गोळीबारानंतर पोलिसांनी अभिजित आणि धैर्यशील सावंत यांना अटक केली होती. मात्र राजेंद्र सावंत फरार झाले होते. त्यांना लॉकडाऊनच्या काळात अटक करण्यात आली. त्यानंतर तिघांविरोधात जिल्हा कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले. राजेंद्र सावंत यांनी वैद्यकीय कारणावरून मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम जामीनही मिळवला होता.
न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने वेगवेगळे पुरावे सादर केले. सरकारी वकील सुजाता इंगळे यांचा युक्तिवाद, बॅलेस्टिक रिपोर्ट, तांत्रिक पुरावे आणि ११ साक्षीदारांचे जबाब कोर्टाने ग्राह्य धरले. या पुराव्यांच्या आधारे तिघांना दोषी ठरवून जन्मठेप देण्यात आली.
राजेंद्र सावंत हे १९८८ मध्ये उत्पादन शुल्क विभागात अनुकंपा तत्त्वावर कॉन्स्टेबल म्हणून कामावर रुजू झाले होते. २००१ मध्ये त्यांना उपनिरीक्षकपदी बढती मिळाली. त्यानंतर त्यांनी शिरोली, रंकाळावेस आणि ओरोस (सिंधुदुर्ग) येथे काम केले. ही घटना घडली तेव्हा ते सिंधुदुर्ग येथे कार्यरत होते आणि कोल्हापूरचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता. भरदिवसा घडलेल्या या गोळीबारात १३ वर्षांनी कोर्टाचा निकाल लागला असून, हेमंत गायकवाड यांच्या खुनाप्रकरणी बाप आणि दोन मुलांना जन्मठेप सुनावण्यात आली आहे.