साहिलच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांची संस्थेकडे सुधारणांची मागणी
IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी निवेदन देत संस्थात्मक सुधारणांची मागणी केली आहे, तर प्रोफेसर सूर्यनारायण डूला यांच्या चौकशीबाबतही भूमिका स्पष्ट केली आहे.
IIT बॉम्बेतील विद्यार्थी साहिलच्या मृत्यूनंतर तिथल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही प्रकारच्या चीटिंगला किंवा शैक्षणिक शिस्तभंगाला आपला पाठिंबा नसल्याचं विद्यार्थ्यांनी या निवेदनात नमूद केलं आहे. मात्र या दुःखद घटनेमुळे कॉलेजमधल्या व्यवस्थेवर आणि प्रक्रियांवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
विद्यार्थ्यांनी सुरू केलेलं आंदोलन शिस्तभंगाला पाठिंबा देण्यासाठी नव्हतं, हे निवेदनात ठळकपणे स्पष्ट करण्यात आलं आहे. उलट, संस्थेत बऱ्याच काळापासून असलेल्या समस्यांकडे लक्ष वेधणं आणि पुढे कोणत्याही विद्यार्थ्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी ठोस बदल घडवून आणणं, हाच आंदोलनाचा हेतू असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांत विद्यार्थी एकत्र येत विविध मागण्यांची यादी तयार करत होते. या मागण्या नंतर औपचारिकरित्या IIT बॉम्बेच्या संचालकांसमोर मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार, संचालकांनी या मागण्या मान्य करून त्यावर स्वाक्षरी केली असून ठराविक वेळेत त्यांची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलं आहे.
याशिवाय संचालक आणि कॉलेजमधल्या इतर अधिकाऱ्यांसोबत एक ओपन हाऊस बैठकही झाली, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. या बैठकीत विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी, काळज्या आणि प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळाली आणि संचालकांनी त्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली, असं निवेदनात म्हटलं आहे. या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याबद्दल आणि समोर आलेल्या समस्यांवर पद्धतशीरपणे तोडगा काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विद्यार्थी प्रतिनिधींनी कॉलेज प्रशासनाचे आभार मानले आहेत.
प्रोफेसर सूर्यनारायण डूला यांच्याबद्दलही विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडली आहे. चौकशी पूर्ण होण्याआधीच त्यांना दोषी ठरवणं किंवा कुठलाही निष्कर्ष काढणं हा आपला उद्देश नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. प्रोफेसर डूला हे फॅकल्टीचे सदस्य म्हणून विद्यार्थ्यांना मान्य असल्याचं सांगत, त्यांच्याशी संबंधित चौकशी निष्पक्ष आणि स्वतंत्रपणे व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. चौकशी सुरू असताना त्यांना डीन ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अफेयर्स या पदाच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवावं, अशीही मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. चौकशीचा अंतिम निष्कर्ष आणि त्यानंतरची कारवाई ठरलेल्या तपास प्रक्रियेनुसारच व्हावी, असं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे.
साहिलच्या मृत्यूशी संबंधित प्रश्न विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली आणि कॉलेजच्या अंतर्गतच सोडवले जावेत, अशीही भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे. या घटनेचा वापर कोणत्याही बाह्य राजकीय हितसंबंधांसाठी, संघटनांसाठी किंवा वेगळ्या कथानकांसाठी करू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे. आपल्या मागण्या कॅम्पसमधल्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांतून आणि काळज्यांमधून पुढे आल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं असून, त्यामुळे सुधारणांची ही प्रक्रिया विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासन यांच्यापुरतीच मर्यादित राहावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि अर्थपूर्ण संस्थात्मक सुधारणांच्या मागणीवर सगळे विद्यार्थी एकवटले असल्याचंही निवेदनात नमूद आहे. विद्यार्थ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत सातत्याने पोहोचवत राहण्यासोबतच सुरक्षित, जबाबदार आणि सहकार्याचं वातावरण असलेला कॅम्पस उभारण्यासाठी कॉलेजसोबत मिळून काम करण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखवली आहे. निवेदनाच्या शेवटी, "IIT बॉम्बेचे विद्यार्थी मजबूत आहेत, IIT बॉम्बेचे विद्यार्थी एकजूट आहेत," असा संदेश देत विद्यार्थ्यांशी संबंधित मुद्दे विद्यार्थ्यांभोवतीच केंद्रित राहावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.