मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:20 IST

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: मैत्रिणीशी शेवटच्या फोन कॉलमधलं संभाषण तपासाच्या केंद्रस्थानी

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचा तपास वेगावला असून, त्याच्या मैत्रिणीशी झालेल्या शेवटच्या फोन कॉलचा तपशील समोर आला आहे.

आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकतो आहे. तपास यंत्रणा साहिलच्या शेवटच्या काही तासांतील हालचाली आणि त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती बारकाईने तपासत आहेत. याच तपासादरम्यान साहिलच्या एका मैत्रिणीशी झालेल्या शेवटच्या फोन संभाषणाबद्दल तपास यंत्रणांच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूआधी साहिलने दुपारी साधारण अडीच वाजता आपल्या मैत्रिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. या संभाषणात त्याने परीक्षेबद्दल आणि स्वतःसोबत घडलेल्या घटनेबद्दल चिंता व्यक्त केल्याचं सांगितलं जातंय. मात्र या फोन कॉलमध्ये जातिसूचक टिप्पणी किंवा त्या घटनेचा कुठलाही उल्लेख झाल्याचं समोर आलेलं नाही.

तपास यंत्रणांच्या सूत्रांनुसार, साहिल फोनवर मैत्रिणीला म्हणाला होता, "माझ्याकडून चूक झाली. माझा थर्मोडायनॅमिक्सचा पेपरही चांगला गेला नव्हता आणि आता हे झालं." यावर मैत्रिणीने त्याला शांत राहायला आणि संयम ठेवायला सांगितलं, तसंच पुढच्या पेपरच्या तयारीवर लक्ष द्यायला सांगितलं.

तपास अधिकाऱ्यांनी या मैत्रिणीचा जबाब नोंदवला आहे. तिच्या म्हणण्यानुसार साहिलसोबतचं हे शेवटचं बोलणं होतं, त्यानंतर त्याने तिच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही. या संभाषणात साहिलने कुठलीही जातिसूचक टिप्पणी केली नव्हती किंवा त्याच्यासोबत कथितरीत्या घडलेल्या घटनेचा उल्लेखही केला नव्हता, असं तिने स्पष्ट केलं आहे.

साहिलच्या मृत्यूनंतर सुरुवातीला पवई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. नंतर हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं असून DCB CID CR No. 124/2026 अंतर्गत त्याची नोंद झाली आहे. गुन्हे शाखा सध्या साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीचा तपास करत असून CCTV फुटेज, डिजिटल पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात असल्याचं समजतं.

मुंबई पोलिसांनी नागरिकांना या प्रकरणाबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरवू नये, तसंच घाईने कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये, असं आवाहन केलं आहे. माध्यमांनीही फक्त अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असं पोलिसांनी सांगितलं असून प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं आहे.

मंगळवारी साहिलच्या वडिलांनी FIRमध्ये नाव असलेल्या दोन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. कुटुंबाला फक्त निष्पक्ष तपास आणि न्याय हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. साहिलच्या कुटुंबीयांनी काही गंभीर आरोप केले असले, तरी या आरोपांची स्वतंत्रपणे तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे आणि तपास पूर्ण होण्याआधी कुठल्याही आरोपाला अंतिम निष्कर्ष मानता येणार नाही.

या प्रकरणात आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांचं नाव समोर आल्यानंतर संस्थेने तपास सुरू असताना त्यांना सुट्टीवर पाठवलं आहे. यापूर्वी त्यांना डीन ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह अफेअर्स या पदावरून हटवण्यात आलं होतं. निष्पक्ष तपासासाठी त्यांना सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं वृत्त आहे. डुल्ला यांच्याविरोधात साहिलच्या मृत्यूप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि जातीय भेदभावाचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोप अजून तपासाच्या कक्षेत असून त्याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सने दहा सदस्यांची उच्चस्तरीय समिती नेमली आहे. यात प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि मानसोपचार तज्ज्ञांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. या समितीला साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी करून एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करायला सांगण्यात आलं आहे. समितीचं अध्यक्षपद आयआयटी पालक्कडच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष प्रा. रमेश व्यंकटेश्वरन यांच्याकडे असल्याचं समजतं.

मुंबई गुन्हे शाखा साहिलच्या मृत्यूआधीचा घटनाक्रम पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. परीक्षा केंद्रापासून हॉस्टेलपर्यंतच्या हालचाली, CCTV फुटेज, फोन आणि इतर डिजिटल पुरावे, तसंच संबंधित विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे जबाब हे तपासाचा भाग आहेत. मैत्रिणीशी झालेला शेवटचा फोन कॉल, साहिलच्या परीक्षेतली परिस्थिती आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दल तपास यंत्रणा नेमके कोणते निष्कर्ष काढते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ