साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण: परीक्षा हॉलमधील CCTV फुटेज समोर, चॅटजीपीटी वापराचा दावा
आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येपूर्वी परीक्षा हॉलमध्ये नेमकं काय घडलं होतं, याचा उलगडा करणारं 54 सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.
आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर संस्थेत आणि बाहेरही मोठी खळबळ उडाली होती. विविध विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणी आंदोलनं सुरू केली होती. याच प्रकरणात आता एक महत्त्वाचा नवा पुरावा पुढे आला आहे. घटना घडली त्या दिवशी परीक्षा हॉलमधलं 54 सेकंदांचं सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागलं असून, त्यातून परीक्षेदरम्यान नेमकं काय घडलं होतं याचा क्रम स्पष्ट होतो आहे. या फुटेजमुळे तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे.
या फुटेजमध्ये साहिल काळा टी-शर्ट घालून पहिल्या बेंचवर बसलेला दिसतो. परीक्षा सुरू असताना ड्युटीवरचे प्राध्यापक त्याच्याजवळ येतात. साहिल मोबाईलवरून चॅटजीपीटीवर प्रश्न अपलोड करून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप आहे. प्राध्यापकांनी त्याला मोबाईल वापरताना रंगेहात पकडलं, असाही आरोप करण्यात आला आहे. फुटेजमध्ये साहिल आणि प्राध्यापक यांच्यात काही वेळ बोलणं होताना दिसतं. त्यानंतर साहिल स्वतःचा मोबाईल प्राध्यापकांच्या ताब्यात देतो आणि बेंचवरून उठून हॉलच्या बाहेर जातो. या घटनेनंतर काही तासांतच साहिलनं पवईतील आपल्या हॉस्टेलच्या खोलीत आत्महत्या केली.
या दुर्दैवी घटनेनंतर संस्था प्रशासन आणि साहिलचं कुटुंब यांच्या भूमिकांमध्ये टोकाचा विरोधाभास दिसून येतो आहे. संस्था प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, साहिलला परीक्षेत मोबाईल वापरल्याबद्दल नियमांची माहिती देऊन नेहमीची समज दिली गेली होती. दुसरीकडे, साहिलचं कुटुंब आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, त्याला परीक्षा हॉलबाहेर नेल्यानंतर गंभीर मानसिक त्रास, अपमान आणि जातीवाचक भेदभावाला सामोरं जावं लागलं आणि त्यातूनच त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं.
या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी संबंधित प्राध्यापकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसंच ॲट्रॉसिटी कायद्याखाली (SC/ST Act) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे (Crime Branch) वर्ग करण्यात आला आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्येपूर्वी साहिलनं आपल्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलणं केलं होतं. या फोन कॉलमध्ये त्यानं, "माझ्याकडून चूक झाली आणि माझा पेपरही चांगला गेला नाही," अशी कबुली दिली होती. या संभाषणात त्यानं जातीवाचक छळाचा कुठलाही उल्लेख केला नव्हता. मात्र मित्राच्या निधनाची बातमी कळल्यावर त्या मैत्रिणीला तीव्र धक्का बसून पॅनिक अटॅक आला आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. हे सीसीटीव्ही फुटेज आता तपास यंत्रणांसाठी या प्रकरणातला एक महत्त्वाचा धागा ठरतं असून, पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत.
ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.