नवी मुंबई विमानतळासाठी एसटीची बससेवा, ७ ऑक्टोबरपासून दादरहून बस; बोरिवली आणि स्वारगेटहूनही सेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बस ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बोरिवली आणि स्वारगेटहूनही विमानतळासाठी बस असतील.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) खास बससेवा आणली आहे. दादर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही बस ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या विमानतळ बससेवेचा प्रारंभ होईल.
दादरबरोबरच आणखी दोन मार्गांवरही विमानतळ बससेवा सुरू होत आहे. बोरिवली ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि स्वारगेट ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा या बस असतील. म्हणजे एकूण तीन मार्गांवरून प्रवाशांना विमानतळापर्यंत जाता येईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारे महत्त्वाकांक्षी पाऊल आहे. विमानतळ उभारणे जितके महत्त्वाचे, तितकेच महत्त्वाचे म्हणजे मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण आणि राज्याच्या इतर भागांशी त्याला सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने जोडणे. याच पार्श्वभूमीवर दादरहून सुरू होणारी एसटीची बस प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यासाठी एसटीची विमानतळ बससेवा महत्त्वपूर्ण ठरेल. विमानतळाला एसटीच्या व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळ्याशी जोडल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, विद्यार्थी तसेच विमानप्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल," असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एसटीची 'लालपरी' राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. या मोठ्या जाळ्याचा उपयोग करून प्रवाशांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने पोहोचता यावे, यासाठी एसटी महामंडळ टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बससेवा उपलब्ध करून देणार आहे. दादर हे मुंबईतील प्रमुख वाहतूक केंद्र आहे. त्यामुळे तिथून विमानतळासाठी थेट बस सुरू होणे ही प्रवाशांसाठी मोठी सोय ठरेल.
मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि वेळ वाचवणारा करण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. विमानतळापर्यंत खंड न पडता आणि सहज मिळणारी सार्वजनिक वाहतूक ही आधुनिक वाहतूक व्यवस्थेची खरी ओळख आहे, असेही त्यांनी म्हटले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एसटीचे व्यापक सार्वजनिक वाहतूक जाळे यांचा मेळ हा महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीतील महत्त्वाचा दुवा ठरेल, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार विमानतळ बससेवा देण्याचा एसटी महामंडळाचा संकल्प आहे, असेही ते म्हणाले.