बुधवार, 14 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
19:56 IST

पुण्यातील २१ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाला दोन कांस्यपदके

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (CID) पुणे येथे झालेल्या २१ व्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात' गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाने घातपातविरोधी तपासणीत दोन कांस्यपदके मिळवली असून पथकाची अखिल भारतीय मेळाव्यासाठी निवड झाली आहे.

पुण्यातील २१ व्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाला दोन कांस्यपदके छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

गडचिरोली : पोलीस दलातील व्यावसायिक नैपुण्य, कौशल्य, कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा वाढवण्याच्या उद्देशाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (CID) ५ ते १० ऑक्टोबर २०२६ दरम्यान पुणे येथे २१ व्या राज्यस्तरीय 'महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस (BDDS) पथकासह विविध २६ विभागांनी सहभाग नोंदवला होता. त्यात गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत पदके मिळवली आहेत.

पुण्यातील या मेळाव्यात सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, संगणक साक्षरता, अँटी सॅबोटेज चेक आणि श्वान पथक अशा वेगवेगळ्या स्पर्धा पार पडल्या. या सर्व स्पर्धांमध्ये लेखी, तोंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात आले.

घातपातविरोधी तपासणी (अँटी सॅबोटेज चेक) या स्पर्धेत गडचिरोली पोलीस दलाच्या बीडीडीएस पथकातील पोलीस हवालदार पंकज हुलके आणि पोलीस अंमलदार धम्मदिप मेश्राम यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर या स्पर्धेतील 'ग्राउंड सर्च' आणि 'रुम सर्च' या दोन्ही उप-प्रकारांमध्ये प्रत्येकी एक, अशी एकूण दोन कांस्यपदके (Bronze Medals) मिळवली.

सहा दिवस चाललेल्या या विविध स्पर्धांमधील एकूण कामगिरीच्या आधारे गडचिरोली परिक्षेत्राला घातपातविरोधी तपासणीत संपूर्ण राज्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे. या उत्तम कामगिरीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या या संघाची आता 'अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्या'साठी (National Police Duty Meet) निवड झाली आहे.

या यशाबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी बीडीडीएस शाखेचे पोलीस हवालदार पंकज हुलके आणि पोलीस अंमलदार धम्मदिप मेश्राम यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच भविष्यातील स्पर्धांसाठी आणि कर्तव्यासाठी त्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ