मुंबईत १० टक्के पाणीकपात सुरू, पाणी वाया घालवल्यास पालिका कारवाई करणार
मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणांतील साठा कमी झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने पाणी जपून वापरण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
एल निनो आणि इंडियन ओशन डायपोल (आयओडी) या हवामान बदलांमुळे २०२६ मध्ये पाऊस कमी पडला. त्याचा थेट परिणाम मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सातही प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यावर झाला आहे. पुढे पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध साठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.
राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ही कपात सध्या सुरू आहे. जलसंपदा विभागाने भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंतचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार पाणी बचतीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून पालिकेने काही अतिरिक्त सूचना काढल्या आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांना रोज सुमारे ४ हजार ६६४ दशलक्ष लिटर पाणी लागते. मात्र सध्या सरासरी ४ हजार १०० दशलक्ष लिटरच पाणीपुरवठा होत आहे. ही तफावत आणि धरणांतील खालावणारी पाणीपातळी पाहता नागरिकांनी पाणी अतिशय जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल असून "पाणी वाचवा, जीवन वाचवा" हा संदेश प्रत्यक्षात आणण्याची हीच वेळ आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
पालिकेच्या सूचनांनुसार नागरिक, औद्योगिक व व्यापारी आस्थापना तसेच विविध संस्थांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी टाळावी. जलतरण तलावांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये. पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी विहिरी, कूपनलिका आणि विंधन विहिरींचा जास्तीत जास्त वापर करावा. औद्योगिक व व्यापारी आस्थापना आणि स्पोर्ट्स क्लब यांच्या पाणीपुरवठ्यातील २० टक्के कपात सुरू राहणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यातून रस्ते धुतले जातात. हे रस्ते धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांतील प्रक्रियायुक्त शुद्ध पाणी किंवा बोअरवेलचे पाणी वापरावे. बांधकामाच्या ठिकाणीही पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी हेच पाणी वापरावे. वाहने धुणे, उद्यानांतील झाडांना पाणी घालणे आणि रस्ते किंवा परिसर स्वच्छ करणे यासाठी विहिरी, कूपनलिका व बोअरवेलचे पाणी वापरावे. सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि प्रसाधनगृहे चालवणाऱ्या संस्थांनीही शक्य तितके पर्यायी जलस्रोत वापरावेत.
पाणीगळतीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जल अभियंता विभागामार्फत विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. गळतीला प्राधान्य देऊन अशी प्रकरणे ठरलेल्या वेळेत हाताळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईतील उपलब्ध जलसाठा काटकसरीने वापरून टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिकांनी आणि सर्व संबंधित आस्थापनांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरवल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा कुठेही आणि कोणत्याही प्रकारे गैरवापर आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.