सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 11:44 IST

कर्जतमधील झाडतोडीवर सयाजी शिंदे संतापले, सह्याद्री वाचवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी कर्जत परिसरात झाडे तोडली जात असल्याने अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे.

कर्जतमधील झाडतोडीवर सयाजी शिंदे संतापले, सह्याद्री वाचवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात टोरंट पॉवर कंपनीसाठी झाडे तोडली जात आहेत. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही राजकीय नेत्यांनी आणि पर्यावरणप्रेमींनी आपला रोष उघडपणे बोलून दाखवला असून सरकारवरही निशाणा साधला आहे. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनीही तीव्र संताप व्यक्त केला आहे. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून ते पर्यावरणासाठी काम करतात. "सह्याद्रीचं वाळवंट करायचं आहे का?" असा सवाल त्यांनी केला. कर्जतच्या झाडतोडीवरून सध्या राज्यभरातून टीका होत आहे.

टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पासाठी होणाऱ्या तोडीबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, भारतातल्या एकूण जंगल जमिनीपैकी 5 टक्के जंगल जमीन आपल्या सह्याद्रीत आहे. तिथून अनेक नद्या वाहतात आणि त्यावरच महाराष्ट्र जगतो आहे. त्या झाडांमुळे आणि डोंगरांमुळे पाऊस येतो. आता त्या भागावर प्रकल्प येत आहेत आणि त्यातला पहिला प्रकल्प म्हणजे टोरेंट प्रकल्प. त्यासाठी 600 एकर जमीन दिली जाते आणि तिथली झाडे तोडली जातात, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करताना शिंदे म्हणाले की, 71 कोटींची गुंतवणूक, 30 हजार कोटींचा काहीतरी फायदा आणि तयार होणारी वीज, हे सगळे कोणासाठी आहे? त्या झाडांसाठी का? तिथले प्राणी, मोर, पाणी आणि तिथले 50 प्रकारचे मासे, यांच्या बाजूने उभे राहायचे आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर माणसांच्या बाजूने उभे राहायचे आहे, असेही ते म्हणाले. या सगळ्यांचे नुकसान करून आणि पर्यावरण घालवून असले प्रकल्प कशाला करायचे, असा त्यांचा प्रश्न होता. आपण आधीच 5 टक्क्यांवर आलो आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून आपण ज्याला सह्याद्री म्हणतो, त्या सह्याद्रीचे मुख्यमंत्र्यांना 25 प्रकल्प उभारून वाळवंट करायचे आहे का, सगळे काही संपवायचे आहे का, असे शिंदे यांनी विचारले.

मुख्यमंत्री आणि आपण निवडून दिलेले नेते या सगळ्यांनी आधी पर्यावरण जपले पाहिजे, बाकीच्या गोष्टी नंतर केल्या पाहिजेत, असे शिंदे म्हणाले. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, इथल्या प्राणी, पक्षी, जीव आणि झाडांची बाजू घ्या. कायद्यात बदल करा. निसर्गाला फसवू नका, कारण आपण स्वतःलाच फसवत आहोत, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री आणि वनमंत्री (फॉरेस्ट मिनिस्टर) यांना त्यांनी विनंती केली की, नियम बदला, कायद्यात बदल करा आणि झाडे तोडू नका. तुम्हाला जे प्रकल्प करायचे ते करा, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेलाही त्यांनी आवाहन केले की, सर्वांनी पेटून उठा. आपल्या डोळ्यांदेखत सह्याद्रीचे वाळवंट होऊ द्यायचे नाही, असे सयाजी शिंदे म्हणाले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ