सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 12:12 IST

मूलमध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, चार मंडळांचे अध्यक्ष व चालकांवर गुन्हे

मूलमध्ये विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट, चार मंडळांचे अध्यक्ष व चालकांवर गुन्हे छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात शारदा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याबद्दल पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. २४ ऑक्टोबर रोजी शहरात या मिरवणुका निघाल्या होत्या. गस्तीदरम्यान पोलिसांनी ध्वनीमापक यंत्राने आवाज तपासला, तेव्हा अनेक डीजेचा आवाज ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त निघाला.

चार मंडळांचे अध्यक्ष आणि संबंधित डीजे चालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात काम करणाऱ्या पोलीस अंमलदाराच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ आणि १३६ लावण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मिरवणुका सुरू असताना ही तपासणी झाली.

पहिली कारवाई महात्मा फुले चौक ते गांधी चौक दरम्यान झाली. परमेवरी दुर्गा मंडळाच्या मिरवणुकीत ट्रॅक्टर आणि पिकअप ट्रॅकवर MG पॉवर डीजे, पायल धुमाल आणि ब्लास्टर डीजे वाजवले जात होते. त्यांचा आवाज अनुक्रमे १०२.५ डेसिबल, ११२.८ डेसिबल आणि ९८.०२ डेसिबल असा मोजला गेला. पोलिसांनी वारंवार सांगूनही डीजे मालक व चालकांनी आवाज कमी केला नाही. त्यामुळे मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मुरलीधर खानोरक, तसेच डीजे चालक पंकज गणपत नैताम, उमेश महादेवजी हुन्डे आणि रोहित विजय जुमडे यांच्यावर मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दुसरी कारवाई नाग मंदिर चौक, वार्ड क्रमांक १६ येथे झाली. नाग गणेश शारदा महिला मंडळाच्या मिरवणुकीत बोलेरो पिकअप वाहनावर व्हीआयपी प्लस ७७ नावाचा डीजे खूप मोठ्या आवाजात वाजत होता. तपासणीत त्याचा आवाज ९८.४६ डेसिबल आढळला. आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही चालकाने दुर्लक्ष केले. मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैशाली सचिन घुगरे आणि डीजे चालक यश विश्वास बोल्लीवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला.

तिसरी घटना आंबेडकर चौक, ताडाळा रोड परिसरात घडली. सरस्वती शारदा महिला मंडळाच्या मिरवणुकीत टाटा योद्धा पिकअप गाडीवर 'साईबाबा डीजे' ९४.३९ डेसिबल आवाजात वाजत असल्याचे गस्ती पथकाला दिसले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आवाज कमी करायला सांगितले, पण चालक सुजित शरद रेड्डीवार याने त्याकडे लक्ष दिले नाही. मंडळाच्या अध्यक्षा पुल्लाबाई विष्णू वालकोंडे आणि चालक सुजित शरद रेड्डीवार यांच्यावर मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

चौथी कारवाई महात्मा फुले चौक परिसरात झाली. सार्वजनिक महिला मंडळ वार्ड क्रमांक १ च्या मिरवणुकीत टाटा १११० मिनिट्रक गाडीवर 'गणराया डीजे' ९४.४० डेसिबल आवाजात लावण्यात आला होता. पोलिसांनी सूचना दिल्यानंतरही डीजे चालक मनीष अशोक खोब्रागडे याने आवाज कमी केला नाही. त्यामुळे मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी गणेश रामशेट्टीवार आणि चालक मनीष अशोक खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.

मिरवणुकीत प्रचंड गर्दी होती आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी जागेवर लगेच डीजेचे साहित्य जप्त केले नाही. मात्र मिरवणूक संपल्यानंतर कारवाईच्या भीतीने संबंधित डीजे वाहने आणि चालक पळून गेले. पोलीस प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेवर सर्वाधिक कारवाई मूल पोलिसांनी केली आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ