सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 184 | Moderate 12:21 IST

२० मिलीचे स्किन सीरम हजारो रुपयांना का? घटक, संशोधन आणि पॅकेजिंगमुळे वाढतो खर्च

नियासिनमाइड, व्हिटॅमिन सी किंवा हायलुरोनिक ॲसिड असलेल्या छोट्या बाटलीची किंमत क्रीमपेक्षा खूप जास्त असते. त्यामागची कारणे घटक, संशोधन, पॅकेजिंग आणि चाचण्यांत दडली आहेत.

२० मिलीचे स्किन सीरम हजारो रुपयांना का? घटक, संशोधन आणि पॅकेजिंगमुळे वाढतो खर्च छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आजकाल जनरेशन-झेड असो, मिलेनियल्स असोत किंवा अल्फा जनरेशन, प्रत्येकाच्या स्किनकेअर रुटीनमध्ये स्किन सीरमला मोठी जागा मिळाली आहे. नियासिनमाइड, व्हिटॅमिन सी किंवा हायलुरोनिक ॲसिडसारखे घटक असलेल्या सीरमची २० ते ३० मिलीची छोटी बाटली काही हजार रुपयांना मिळते. साध्या मॉइश्चरायझर किंवा क्रीमच्या तुलनेत सीरम इतके महाग का, असा प्रश्न अनेक ग्राहकांच्या मनात येतो.

किंमत फक्त ब्रँडच्या नावामुळे आणि आकर्षक पॅकेजिंगमुळे वाढते का, की त्यामागे काही शास्त्रीय कारणेही आहेत, हे पाहूया.

सर्वात आधी सीरम म्हणजे काय ते समजून घ्यायला हवे. सीरम हे प्रामुख्याने पाणी किंवा तेलावर आधारित, अतिशय हलके द्रव असते. मॉइश्चरायझर त्वचेच्या वरच्या थरावर (Epidermis) संरक्षक आवरण तयार करते आणि त्वचेचा ओलावा टिकवते. सीरममधील सक्रिय घटक मात्र अत्यंत सूक्ष्म असतात. ते त्वचेच्या खोल थरात (Dermis) सहज शोषले जातात आणि डाग, सुरकुत्या किंवा असमान त्वचा अशा विशिष्ट समस्यांवर थेट काम करतात.

पहिले कारण म्हणजे सक्रिय घटकांचे प्रमाण. मॉइश्चरायझरमध्ये पाणी आणि इमोलियंट्स जास्त असतात. सीरममध्ये मात्र व्हिटॅमिन सी, हायलुरोनिक ॲसिड, सेरामाइड्स आणि रेटिनॉलसारखे घटक जास्त प्रमाणात आणि शुद्ध स्वरूपात असतात. हा कच्चा माल विकत घेणे आणि त्याची शुद्धता टिकवणे खूप खर्चिक असते.

ओटेरियाचे संस्थापक विभोर रस्तोगी यांच्या मते, "सीरमची किंमत ही केवळ डब्यावरील घटकांची नसून, त्या घटकांचा स्रोत, गुणवत्ता आणि त्यांच्यावर केलेले संशोधन (R&D) यावर अवलंबून असते."

उदाहरणार्थ, त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी हायलुरोनिक ॲसिड वापरले जाते. पण बाजारात मिळणारे सगळे हायलुरोनिक ॲसिड एकसारखे नसते. उच्च आण्विक वजनाचे (High Molecular Weight) ॲसिड त्वचेच्या वरच्या थरावरच राहते, तर कमी आण्विक वजनाचे (Low Molecular Weight) सूक्ष्म ॲसिड त्वचेच्या आत जाते. असे सूक्ष्म घटक तयार करणे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने गुंतागुंतीचे आणि खूप महाग असते.

त्वचेचे रक्षण करण्यासाठी मल्टी-सेरामाइड कॉम्प्लेक्स आणि पॉलिपेप्टाइड्स वापरले जातात. चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि एक्सप्रेशन लाइन्स कमी करण्यात पेप्टाइड्स अत्यंत प्रभावी मानले जातात. बोटॉक्ससारख्या महागड्या उपचारांना हे घटक सुरक्षित पर्याय ठरतात. अशा घटकांचे योग्य मिश्रण बनवणे खर्चिक असते.

सीरम बनवणे म्हणजे नुसते घटक एकत्र करणे नव्हे. व्हिटॅमिन सीसारखे घटक हवा आणि प्रकाशाच्या संपर्कात आले की लगेच ऑक्सिडाईझ होतात, म्हणजे खराब होतात. त्यामुळे सीरम शेवटच्या थेंबापर्यंत प्रभावी राहावे यासाठी वैज्ञानिक संशोधन करावे लागते.

औषधी गुणधर्म टिकावेत म्हणून काचेच्या गडद (Amber) बाटल्या किंवा एयरलेस पंप पॅकेजिंग वापरावे लागते. या खास पॅकेजिंगमुळे निर्मितीचा खर्च वाढतो. शिवाय सीरम त्वचेसाठी सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी क्लिनिकल आणि लॅब चाचण्यांतून जावे लागते, त्याचा थेट परिणाम अंतिम किमतीवर होतो.

मग महागडे सीरम घेणे खरोखर फायद्याचे आहे का? एका वेळी सीरमचे फक्त २ ते ३ थेंब पुरेसे असतात, त्यामुळे २० मिलीची बाटली सहज २ ते ३ महिने चालते. पिगमेंटेशन, अकाली वृद्धत्व किंवा कोरडेपणा अशा एखाद्या विशिष्ट समस्येवर ठोस उपाय हवा असेल, तर नेहमीच्या क्रीमपेक्षा योग्य सीरममध्ये पैसे गुंतवणे अधिक प्रभावी ठरते.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ